शनिवारी पेब किल्यावर ट्रेकिंगसाठी मुंबईतील अंधेरी ओशिवारा परिसरातून ऐश्वर्या प्रकाश धालकडे ही तरुणी आपले सहकारी अनिकेत मोहिते, अंकिता मराठे, रुपेश वीर, तन्वी पार्टे यांच्यासह आली होती. किल्ला सर करताना एका अवघड जागी ऐश्वर्याचा अचानक पाय घसरून दरीत कोसळली. मात्र खोल दरीत पडून देखील ऐश्वर्या केवळ दैव बलवत्तर म्हणून जिवंत होती. दरीतून ती वाचवा… वाचवा… म्हणून धावा करत होती. तिचा आवाज ऐकून पेब किल्यावरील पुजारी यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. माथेरान पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शेखर लव्हे यांनी त्वरित सह्याद्री रेस्क्यू टीमला पाचारण केले.
माथेरानपासून पेब किल्ला शहराबाहेर असल्याने अनंत अडचणींचा सामना करावा लागला. सह्याद्री रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी आपल्या साहित्यासह हजर होत सर्च ऑपेरेशन सुरु केले. पोलीस प्रशासन, वन विभाग, रेस्क्यू टीम, स्थानिक नागरिक यांनी मोलाची मदत करत तरुणीला वाचवण्यासाठी हातभार लावला. सुमारे ७०० फूट खोल दरीत अडकून पडलेल्या ऐश्वर्याला बाहेर काढणे सोप्पे नव्हते. उभा आणि उंच डोंगरकडा हे मिशन धोकादायक असल्याची साक्ष देत होता. पायी चालत जाऊन त्या जागेचा आढावा घेण्यात आला.
थोडं थोडं करून दरीमध्ये उतरत दोर सोडण्यात आला. त्यानंतर मदत यंत्रणेने ऐश्वर्याला धीर देत रॅपलिंगचे दोर दरीत ऐश्वर्यापर्यंत सोडले. अतिशय कठीण जागेतून रेस्क्यू पथक ऐश्वर्यापर्यंत पोहोचले. तिला अश्वस्थ करून रस्सीला बांधण्यात आले. त्यानंतर ऐश्वर्याला सुखरूप बाहेर काढण्यात यंत्रणेला यश आले. तब्बल १ वाजता सुरु झालेले हे मिशन सायंकाळी सहाच्या दरम्यान संपले. सहयाद्री रेस्क्यू टीमने निस्वार्थी भावनेने तरुणीला वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. या तरुणीला जीवनदान दिल्याबद्दल सर्व स्तरातून या टीमचे कौतुक होत आहे.