भंडाऱ्याच्या लाखनी येथे आयोजित दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमास भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावकुळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्यासह खासदार सुनील मेंढे, माजी मंत्री डॉ. परिणय फुके, लोकसभा संयोजक बाळा अंजनकर, जिल्हाध्यक्ष प्रकाश बाळबुधे, लोकसभा प्रभारी विजय शिवणकर, माजी खासदार शिशुपाल पटले आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तीन राज्यांत मिळालेल्या निर्भेळ यशाने चंद्रशेखर बावनकुळे यांना अत्यानंद झाला होता. त्यांचा हाच आनंद त्यांच्या भाषणात दिसून आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजप विजयाचा एक एक टप्पा पार करतो आहे. तीन राज्यांत मिळालेल्या घवघवीत यशाने लोकसभेला आपण हॅट्रिक करणार यावर शिक्कामोर्तब झालंय. आपल्याकडेही (महाराष्ट्रात) वेगळी परिस्थिती नसेल असं सांगताना महाराष्ट्रात पुढील मुख्यमंत्री म्हणून वानखेडेवर कोण शपथ घेणार? असा प्रश्न विचारत चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजप कार्यकर्त्यांकडून देवेंद्र फडणवीस यांचं नाव वदवून घेतलं.
आगामी लोकसभा निवडणूक निकालात भाजपला दणदणीत विजय मिळेल. मे महिन्यात देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा शपथ घेतील. त्यासाठी आपल्याला महाराष्ट्रातून ४५ खासदार निवडून द्यायचे आहेत. भंडाऱ्यातील खासदार हा सर्वाधिक मतांनी निवडून द्यायचाय, असं आवाहन कार्यकर्त्यांना करताना एक संकल्पही बावनकुळेंनी बोलून दाखवला. वानखेडे स्टेडियमवर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. त्यासाठी आपण सर्वांनी ताकद लावायची. आपले उमेदवार चांगल्या मतांनी निवडून आणायचे, असं बावनकुळे म्हणाले.