• Sat. Sep 21st, 2024
आता देशाला कळले खरे पनौती कोण? देवेंद्र फडणवीसांची राहुल गांधीवर टीका

म. टा. प्रतिनिधी, नागपू : मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढमधील विधानसभा निवडणूकांमध्ये भाजपला मिळालेल्या अभूतपूर्व यशाचे शिल्पकार हे पंतप्रधान नरेंद्र मोदीच आहेच. जनतेने पुन्हा एकदा पंतप्रधानांवर विश्वास दाखवला आहे. मोदी हे भाजपचे ब्रॅन्ड आहेत. त्यामुळे या निकालाने खरा ‘पनौती’ हे काँग्रेसला कळले असेल अशी बोचरी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर केली.

चार राज्यांच्या निकालानंतर फडणवीस नागपुरातील त्यांच्या धरमपेठ येथील निवासस्थानी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. या निकालानंतर जनतेने इंडिया आघाडीला नाकारले असल्याचे या निकालाने स्पष्ट झाले आहे. ‘इंडिया’ आघाडीला मतदारांनी पूर्णपणे नाकारलय. जनतेचा नरेंद्र मोदी यांच्यावर प्रचंड मोठा विश्वास आहे. ज्या पारदर्शी प्रामाणिकतेने त्यांनी गरीब कल्याणाचा अजेंडा राबविला, सरकार खऱ्या अर्थाने जनतेसाठी काम करते आहे, हा विश्वास त्यांनी जनतेच्या मनात निर्माण केला. या निकालाने जनतेने इंडिया आघाडी आणि राहुल गांधी यांचा अजेंडा नाकारला हेही स्पष्ट झाले. नेमकी पनौती कोण हेही आता काँग्रेस पक्षाला कळाले असेल आणि त्यामुळे भविष्यात ते असे शब्द आता वापरणार असेही फडणवीस यावेळी म्हणाले.

आता इंडिया आघाडीची लवकरच ईव्हीएमवर बैठक होईल, असा टोला लगावताना ते म्हणाले की, जोवर या मानसिकतेतून काँग्रेस बाहेर पडत नाही, तोवर त्यांचे काहीच होऊ शकत नाही. आगामी लोकसभा निवडणुकीत तेलंगणात भाजपाचेच सर्वाधिक खासदार निवडून येतील. तीच स्थिती कर्नाटकमध्ये सुद्धा अनुभवास येईल. महाराष्ट्रातही लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत दणदणीत यश आम्ही मिळवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

निकालांचे विश्लेषण करताना फडणवीस म्हणाले, या निवडणूकात भाजपची सरासरी मतांची टक्केवारी १० टक्क्यांहून अधिकने वाढली आहे. छत्तीसगड, मध्यप्रदेशसह तेलंगणमध्येही ही वाढली आहे. आज जाहीर झालेल्या ६३९ जागांच्या निकालांपैकी ३३९ जागा भाजपने जिंकल्या आहेत. यावरून जनतेचा विश्वास भाजपवरच असल्याचे दिसून येत आहे. आगामी लोकसभा निवडणूकीत जनता पुन्हा एकदा मोदींच्या नेतृत्त्वात भाजपच्याच हाती सत्ता देईल असा विश्वासही फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed