• Mon. Nov 25th, 2024

    लातूर येथील दिव्यांग औद्योगिक प्रशिक्षण संस्था दिशादर्शक ठरेल – मंत्री मंगलप्रभात लोढा

    ByMH LIVE NEWS

    Dec 2, 2023
    लातूर येथील दिव्यांग औद्योगिक प्रशिक्षण संस्था दिशादर्शक ठरेल – मंत्री मंगलप्रभात लोढा

    लातूर, दि. 02 (जिमाका) : हरंगुळ बु. येथील संवेदना दिव्यांग औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या रूपाने आज राज्यातील पहिल्या दिव्यांग औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे उद्घाटन होत आहे. ही संस्था दिव्यांग बांधवांना स्वावलंबी बनविण्याच्या उपक्रमात दिशादर्शक ठरेल, असा विश्वास कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केला. संवेदना दिव्यांग औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या उद्घाटन समारंभात दूरदृश्य प्रणालीद्वारे मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

    क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, खासदार सुधाकर शृंगारे, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार अभिमन्यू पवार, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगंबर दळवी, जनकल्याण समितीचे प्रांत अध्यक्ष अजित मराठे, हरंगुळच्या सरपंच शीतल झुंजारे, संवेदना समितीचे अध्यक्ष डॉ. राजेश पाटील यांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती. राज्य शासनामार्फत संवेदना दिव्यांग औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला 1 कोटी रुपयांचा धनादेश व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगंबर दळवी यांनी सुपूर्द केला. मान्यवरांच्या हस्ते कोनशीला अनावरण करून संवेदना दिव्यांग औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे उद्घाटन करण्यात आले.

    प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिव्यांग बांधवांना नवी ओळख मिळवून दिली. त्यांच्यासाठी विविध उपक्रम राबविले. त्यामुळे सर्वसामान्यांचा दिव्यांग बांधवांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. लातूर येथे संवेदना प्रकल्पाच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांसाठी फार मोठे काम उभा राहिले आहे. अतिशय तळमळ आणि चिकाटीने ही संस्था दिव्यांग बांधवांसाठी काम करीत आहे. या संस्थेत दिव्यांग बांधवांसाठी स्वतंत्र औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरु करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. याठिकाणी दिव्यांग बांधवांना औद्योगिक प्रशिक्षण देण्यात येणार असून त्यामुळे दिव्यागांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असे ना. लोढा यांनी सांगितले.

    दिव्यांग बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी मदत होईल : ना. बनसोडे

    राज्य शासनामार्फत स्वतंत्र दिव्यांग कल्याण मंत्रालय स्थापन करून विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. या माध्यमातून दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न सुरु आहेत. नव्याने सुरु होत असलेल्या संवेदना औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रशिक्षणामुळे दिव्यांग बांधव स्वावलंबी बनतील. तसेच त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी मदत होईल, असे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले. तसेच लातूर येथे रेल्वे बोगी निर्मिती कारखाना सुरु होणार असून त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये याबाबतचे प्रशिक्षण देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

    दिव्यांग खेळाडूंसाठी क्रीडा व युवक कल्याण विभागाच्या माध्यमातून अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. तसेच संवेदना प्रकल्प येथील दिव्यांग विद्यार्थ्यांना क्रीडा सुविधा पुरविण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल. समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहात संवेदना प्रकल्पातील विद्यार्थ्यांच्या निवासव्यवस्थेबाबत लवकरच संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल, असे ना. बनसोडे यांनी यावेळी सांगितले.

    प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून केंद्र शासनाने दिव्यांग बांधवांसाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत. या अंतर्गत जिल्ह्यात एकाच वेळी 9 हजार दिव्यांग बांधवांची तपासणी करून त्यांना विविध साधनांचे वाटप करण्यात आले. तसेच यापुढेही दिव्यांग बांधवांसाठी विविध उपक्रम राबविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे खासदार सुधाकर शृंगारे म्हणाले.

    दिव्यांग बांधवांसाठी स्वतंत्र औद्योगिक प्रशिक्षण संस्था उभारण्याचा उपक्रम अतिशय अभिनव आहे. दिव्यांग बांधवांना औद्योगिक प्रशिक्षण देण्यासाठी राज्यभर असे उपक्रम राबविले जावेत. दिव्यांग बांधवांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्ससारखे काळानुरूप उपयुक्त ठरणारे प्रशिक्षण देण्यासाठी प्रयत्न व्हावेत. तसेच औद्योगिक प्रशिक्षण घेतलेल्या दिव्यांग बांधवांना नोकरीच्या, रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासकीय आणि सामाजिक पातळीवर प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी सांगितले.

    दिव्यांग बांधवांसाठी स्वतंत्र औद्योगिक प्रशिक्षण संस्था उभारण्याचा उपक्रम अतिशय कौतुकास्पद असून राज्यातील पहिली दिव्यांग औद्योगिक प्रशिक्षण संस्था लातूर जिल्ह्यात उभारण्यात आली, ही जिल्ह्यासाठी अभिमानस्पद बाब असल्याचे आमदार अभिमन्यू पवार यांनी सांगितले. तसेच राज्य शासन दिव्यांग बांधवांच्या विकासाठी आग्रही असून दिव्यांग कल्याणासाठी विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

    दिव्यांग औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमुळे दिव्यांग बांधव आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनण्यास मदत होईल. विविध विभागामार्फत दिव्यांग बांधवांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचे अभिसरण करून त्यांच्या कल्याणसाठी विविध उपक्रम हाती घेण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी सांगितले.

    दिव्यांग बांधवांना उच्च दर्जाचे औद्योगिक प्रशिक्षण मिळण्यासाठी संवेदना औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमुळे मदत होणार आहे. या संस्थेतील साधनसामग्री दिव्यांग विद्यार्थ्यांना सहाय्यभूत ठरेल अशी असून राज्यातील दिव्यांग बांधवांना येथे प्रशिक्षण देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे राज्याच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगंबर दळवी यांनी सांगितले.

    अध्यक्षीय समारोपात श्री. मराठे यांनी जनकल्याण संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. तर प्रास्ताविकामध्ये संवेदना प्रकल्पाचे कार्यवाह डॉ. योगेश निटूरकर यांनी संवेदना प्रकल्पाच्या स्थापनेपासून ते आजपर्यंतचा प्रवाश सांगितला. तसेच संवेदना दिव्यांग औद्योगिक प्रशिक्षण संस्था स्थापनेचा उद्देश, प्रवेश क्षमता, प्रशिक्षण याबाबत माहिती दिली. संवेदना प्रकल्पाचे अध्यक्ष डॉ. राजेश पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले. जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या वार्षिक अहवालाचे यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी दिव्यांग विद्यार्त्यानी विविध गीतांचे सादरीकरण केले.

    दिव्यांग कल्याणासाठी विशेष कामगिरीबद्दल विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालायचे अधिष्ठाता डॉ. समीर जोशी, खोपेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच तेजाबाई मोरे, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील परिचारक योगेश वाघ यांचा यावेळी गौरव करण्यात आला. तसेच संवेदना दिव्यांग औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या उभारणीमध्ये सहकार्य करणारे लातूर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे माजी प्राचार्य विठ्ठल गाडेकर, प्रभारी प्राचार्य मनीषा बोरूळकर यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed