प्रश्न : अलीकडेच राजौरी भागात दहशतवाद्यांशी चकमक उडाली. त्यातून दहशतवादाने पुन्हा डोके वर काढल्याचे दिसत आहे का?
उत्तर : जम्मू-काश्मीरमध्ये स्थानिक तरुणांची माथी भडकविणारे व त्यांना कट्टरवादाचे बाळकडू पाजणारे (रॅडिकलायझेन) घटक कायम आहेत. हा घटक कायम असेपर्यंत दहशतवादाचे समूळ उच्चाटन कठीण आहे. या अशा घटना अधून-मधून घडतीलच. मात्र या घटनांना पायबंद घालण्याचे कसोशीने प्रयत्न सुरू आहेत.
प्रश्न : या प्रकारांचा बीमोड करण्यासाठी कोणते प्रयत्न सुरू आहेत?
उत्तर : दहशतवादाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी ऑपरेशन सर्पविनाशद्वारे दहशतवादाची वारुळे पिंजून काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत, तर दुसरीकडे ऑपरेशन सद्भावनासारख्या मोहिमांमधून विविध सामाजिक उपक्रमांद्वारे तरुणांना भारताच्या उर्वरित भागाशी सांस्कृतिक-सामाजिकदृष्ट्या जोडण्याचा प्रयत्न होत आहे. शिवाय कलम ३७० रद्द झाल्याचाही लाभ होत आहे. या सर्व गोष्टींमुळे परिस्थिती निवळली आहे. मात्र पूर्णपणे शांतता दिसण्यासाठी काही दशके जाऊ द्यावी लागतील.
प्रश्न : एवढ्या प्रयत्नांनंतरही दहशतवाद का उफाळून येतो?
उत्तर : पाश्चिमात्य देशात दहशतवादी किंवा त्यांचे समर्थक यांना पकडले की, त्यांना जराही दयामाया दाखविली जात नाही. प्रसंगी छळही होतो. त्यांना डांबून ठेवले जाते. परंतु आपण कधीच इतके कठोर होत नाही, तसे आपण करणारही नाही. आपल्याकडील सामाजिक परिस्थितीही भिन्न आहे. शिवाय रॅडिकलायजेशन होत असेल, तर त्याचा सामना क्रौर्याने करता येणार नाही, त्यासाठी विविध स्तरीय उपाय करावे लागतात व मनातील कीड काढून टाकावी लागते.
प्रश्न : पाकिस्तानकडून होणाऱ्या चिथावणीमुळे ही समस्या उग्र होते, त्यावर आपण काय केले आहे ?
उत्तर : पाकिस्तान दहशतवादाला कायम खतपाणी घालतो, हे नक्की. आपण पाकिस्तानला मिळणाऱ्या जागतिक निधीचे स्रोत बंद करण्यात यशस्वी झालो आहोत. आंतरराष्ट्रीय स्तरावर बेकायदा निधी किंवा मनी लाँड्रिंगविरुद्ध फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स म्हणजेच एफएटीएफ कार्यरत आहे. एफएटीएफच्या माध्यमातून भारताने पाकिस्तानातील दशहतवाद्यांपर्यंत पोहोचणाऱ्या या बेकायदा निधीवर निर्बंध आणले आहेत. पाकिस्तानची आज जी कमकुवत आर्थिक स्थिती आहे, ती यामुळेच आहे. हे एक मोठे यश ठरले आहे.
मुलाखत : चिन्मय काळे