मुंबई, दि. 30 : नेपाळमधील माधेश, टेराई या भागातील 16 पत्रकारांच्या शिष्टमंडळाने आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री अतिथीगृहात भेट घेतली व विविध विषयांवर संवाद साधला. भारत व नेपाळमधील संबंध आणखी दृढ करण्यासाठी महाराष्ट्राच्या वतीने प्रयत्न करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
भारत व नेपाळ यांच्यातील संबंध वृद्धिंगत करण्यासाठी कार्य करणाऱ्या काठमांडू येथील भारत-नेपाळ फ्रेंडशिप सोसायटीच्या फ्री यूथ डेमॉक्रेटिक ऑर्गनायझेशनच्या वतीने नेपाळमधील पत्रकारांचे शिष्टमंडळ 26 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर या कालावधीत भारत भेटीवर आले आहे. नवी दिल्लीनंतर मुंबई भेटीवर आलेल्या या शिष्टमंडळाने आज सह्याद्री अतिथीगृहात उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी फ्री यूथ डेमोक्रेटिक ऑर्गनायझशनचे अध्यक्ष अरविंद मोहतो, सचिव जीवित सुबेदी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक (वृत्त व जनसंपर्क) डॉ. राहुल तिडके यांच्यासह नेपाळमधील वरिष्ठ पत्रकार उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, भारत व नेपाळमध्ये पुरातन काळापासून सांस्कृतिक संबंध आहेत. नेपाळबद्दल प्रत्येक भारतीयांच्या मनात प्रेम, स्नेह आहे. मुंबई, पुणे, नागपूर यासह महाराष्ट्रातील विविध भागात नेपाळी समाज वास्तव्यास आहे. या नेपाळी नागरिकांना येथील नागरिक हे आपले बंधू समजतात. येथे वास्तव्यास असणाऱ्या नेपाळी बांधवांनीही येथील संस्कृती आत्मसात केली आहे. भारत नेपाळमधील संबंध अधिक वृद्धिंगत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या वतीने सहकार्य करण्यात येईल.
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून महाराष्ट्र हे देशातील प्रगत राज्य आहे. देशाच्या सकल उत्पन्नात महाराष्ट्राचा वाटा हा 15 टक्के आहे तर निर्यातीमध्ये 20 टक्के व उत्पादन निर्मितीमध्ये 20 टक्के वाटा राज्याचा आहे. देशात येणाऱ्या परदेशी गुंतवणुकीपैकी 29 टक्के गुंतवणूक ही एकट्या महाराष्ट्रात येते. मुंबई ही देशाची आर्थिक, व्यावसायिक केंद्राबरोबरच करमणुकीची राजधानी म्हणूनही ओळखली जाते. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पायाभूत प्रकल्प पहायला मिळतात. मुंबई बरोबरच पुणे हे मोठ्या प्रमाणात माहिती तंत्रज्ञान, उत्पादन व सेवा क्षेत्रात आघाडीवर आहे. सुंदर समुद्र किनारा, घाट रस्ते, वने याबरोबरच छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या किल्ल्यांमुळेही राज्यात पर्यटन क्षेत्र वाढले आहे. देशाच्या विकासात महाराष्ट्राचे मोठे योगदान असल्याचेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
यावेळी भारत नेपाळ संबंध वृद्धिंगत करण्यासाठी महाराष्ट्रातील क्रिकेट अकादमीत नेपाळच्या खेळाडूंना प्रशिक्षण देणे, त्यांच्यात नेपाळमध्ये सामने आयोजित करणे, सांस्कृतिक देवाणघेवाण करणे, यासाठी उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी पुढाकार घ्यावा, अशी विनंती शिष्टमंडळातील पत्रकारांनी केली.
००००
नंदकुमार वाघमारे/स.सं