• Tue. Nov 26th, 2024

    बचत गटाच्या सक्षमीकरणासाठी शासन प्रयत्नशील – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

    ByMH LIVE NEWS

    Nov 27, 2023
    बचत गटाच्या सक्षमीकरणासाठी शासन प्रयत्नशील – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

    नागपूर दि. 27 : राज्य शासन महिला बचत गटाच्या बळकटीकरणासाठी व सक्षमीकरणासाठी कायम प्रयत्नरत आहे. बचत गटांच्या चळवळीतून महिला एकत्र आल्या व त्यांना प्रगतीचा मार्ग मिळाला असल्याचे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज केले.

    दाभा येथील ‘ॲग्रो व्हिजन’ या कृषी प्रदर्शनात महिला बचत गटाच्या मेळाव्याला श्रीमती तटकरे मार्गदर्शन करतांना बोलत होत्या. केंद्रिय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

    श्रीमती तटकरे पुढे म्हणाल्या की, आपली इच्छाशक्ती हीच आपल्याला प्रगतीकडे नेणार आहे. बचत गटाच्या महिलांनी सक्षम होण्याची आपली इच्छाशकती कायम ठेवावी. महिला व बाल विकास विभाग बचत गटांना सर्वतोपरी मदत करण्यात अग्रेसर राहणार असल्याची ग्वाही देतांना बचत गटांच्या नाविण्यपूर्ण प्रकल्पांसाठी जिल्हा नियोजन मधील 3 टक्के निधीतून मदत करण्याचे, बचत गटांकडून शाळांसाठी गणवेश शिवून घेण्यात येणार असल्याचे तसेच मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी बचत गटाकडून उत्पादीत मधाचा पोषण आहारात समावेष करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. बचत गटांना आपली उत्पादने विक्रीसाठी कायमस्वरूपी व्यासपीठ मिळावे याकडेही त्यांनी लक्ष वेधले. यावेळी त्यांनी महिला बचत गटांसाठी शासनातर्फे राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती दिली.

    केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महिला बचत गटांना व्यवसाय उद्योगात यशस्वी होण्यासाठी उच्च गुणवत्ता, स्वच्छता, तयार उत्पादनाचे उत्तम पॅकेजींग तसेच ब्रँडींग, मार्केटिंग व जाहिरात करण्याचा मंत्र दिला.

    याप्रसंगी बचत गटांसाठी विविध योजनांची माहिती देणारे ‘यस्वयंसिद्धा’ तसेच ‘स्वयंसहायता बचत गटाद्वारे महिलांचे सक्षमिकरण’ या दोन पुस्तकांचे प्रकाशन तसेच विविध बचत गटांना त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी मान्यवरांच्या हस्ते गौर‍विण्यात आले.

    सुरवातीला महानगरपालिका उपायुक्त विशाल वाघ यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविकेतून कार्यक्रमाच्या आयोजनाची माहिती दिली. सुधाकर इंगोले यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.

    तत्पुर्वी मंत्री आदिती तटकरे यांनी ‘ॲग्रो व्हिजन’ कृषी प्रदर्शनातील विविध स्टॉल्सना भेट देवून पाहणी केली. सर्वात जास्त स्टॉल बचत गटांसाठी ठेवल्याबद्दल त्यांनी आयोजकांना धन्यवाद दिले.

    मेळाव्याला माविमेचे रंजन वानखडे, आशिषकुमार बागडे, प्रविण पडोळे, अश्विनी जिचकार, आशिष बागडे, निलेश डांगे, प्रवीण पडोळे तसेच बचत गटाच्या महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed