• Mon. Nov 25th, 2024

    भारतीय संविधानामुळे माणूस म्हणून जगण्याची समान संधी – पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन

    ByMH LIVE NEWS

    Nov 26, 2023
    भारतीय संविधानामुळे माणूस म्हणून जगण्याची समान संधी – पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन

    कोल्हापूर, दि. 26 (जिमाका) : भारतीय संविधानामुळेच माणूस म्हणून जगण्याची समान संधी सर्वांना मिळाली आहे, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री, तथा; कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. कोल्हापुरातील बिंदू चौकात संविधान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री मुश्रीफ बोलत होते. भारतीय संविधानाचे रक्षण ही आम्हा सर्व भारतीयांची जबाबदारीच आहे, असेही ते म्हणाले.

    संविधान दिनानिमित्त कोल्हापुरातील बिंदू चौकामध्ये भारतरत्न व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले  यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी अभिवादन केले. उपस्थित नागरिक व विद्यार्थ्यांना पालकमंत्री मुश्रीफ यांनी भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेची शपथ दिली. त्यानंतर त्यांनी संविधान रॅलीला हिरवा झेंडा दाखविल्यानंतर रॅली सुरू झाली.

    संविधान रॅलीमध्ये ‘भारतीय संविधानाचा विजय असो’,  यासह छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या महामानवांच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी बोलताना मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सतत अकरा महिने, अकरा दिवस जगातील अनेक महत्त्वांच्या देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास केला. त्यामुळेच जगातील सर्वात जुन्या असलेल्या अमेरिकेच्या राज्यघटनेपेक्षाही सरस अशी भारतीय राज्यघटना तयार झाली. या राज्यघटनेने सर्वांना एकच मताचा अधिकार देऊन माणसामाणसातील जातिभेदाच्या, वर्णभेदाच्या आणि उच्चनीचतेच्या भिंती पाडून माणूस म्हणून समान पातळीवर जगण्याची ऊर्जा दिली. संविधानाची रक्षा करणे ही आम्हा सर्वांचीच जबाबदारी आहे.

    संविधान रॅलीमध्ये प्रायव्हेट हायस्कूल, न्यू हायस्कूल, नेहरू हायस्कूल, विद्यापीठ हायस्कूल, इंदुमतीदेवी हायस्कूल, साई हायस्कूल आदी शाळांचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले. यावेळी माजी महापौर निलोफर आजरेकर, बाळासाहेब भोसले, दगडू भास्कर, आयुक्त के. मंजूलक्ष्मी, अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख जयश्री देसाई, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन साळे, संभाजी पवार, सुनिल खमितकर, सचिन पाटील, अरविंद रंगापूरे, बाळासाहेब भोसले, डी.जे.भास्कर, संदानंद दिघे, नामदेव कांबळे, वसंतदादा मुळीक, बबन रानगे, राजेश लाटकर, आदिल फरास, शरयू खत्री तसेच विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, शाळा-महाविद्यालयाचे शिक्षक, व शिक्षकेतर कर्मचारी, शासकीय वसतीगृहातील गृहपाल व विद्यार्थी आदी उपस्थित होते.

    संविधान दिनाची रॅलीचे उद्घाटन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी चित्ररथास हिरवा झेंडा दाखवून केला. रॅलीमध्ये संविधानिक मुल्ये, संविधानाची कलमे, लोकशाहीची तत्वे, घोषवाक्ये आदी फलके होती. बिंदू चौक, छ. शिवाजी महाराज पुतळा, गंगाराम कांबळे यांचे स्मारक असे मार्गक्रमण करून दसरा चौक येथे छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून संविधान रॅलीचा समारोप करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सचिन परब यांनी केले.

    000

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed