नागरिकांची फसवणूक आणि दमबाजी नित्यनियमाची असल्याने अखेर तक्का गावातील विशाल धर्मा पगडे यांनी सुनिल बहिरावर शासनाची फसवणूक केल्याबद्दल कायदेशीर कारवाई करण्यासंदर्भात पनवेल शहर पोलीस ठाण्यात व पनवेल पालिकेस पुराव्यानिशी तक्रार दाखल केली होती. या अर्जाच्या नुसार चौकशी करून पालिकेचे अधिकारी नितीन हुद्दार यांनी शासनाच्या वतीने पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे. शेकापचे माजी नगरसेवक सुनिल बहिरा तक्का गावातील असून त्याने सन १९९७ मध्ये बोगस कागदपत्रांच्या आधारे तत्कालीन पनवेल नगर परिषदेकडून अंतीम भुखंड क्रमांक १६३३ ब आणि १६३७ या भुंखडावर इमारत बांधकाम परवानगी मिळवलेली आहे.
हे दोन्ही भुखंड हे कै. गोविंद काथोर बहिरा यांच्या मालकीचे होते. गोविंद काथोर बहिरा यांचे निधन दिनांक १७ नोव्हेंबर १९७७ रोजी झालेले आहे. सुनिल बहिरा याने गोविंद काथोर बहिरा हे मयत असताना देखील त्यांच्या जागी तोतया व्यक्ती उभा करुन पनवेल कार्यकारी दंडाधिकारी यांचे समोर २० रुपयांचे स्टॅम्पवर शपथपत्र केलेले आहे. सदरचा स्टॅम्प पेपर सुनिल बहिरा याने विकत घेतल्याची नोंद सदरच्या स्टॅम्पवर नमूद आहे. सदरचा शपथपत्र विशाल पगडे यांनी माहिती अधिकारात प्राप्त केलेले आहे. कै. गोविंद काथोर बहिरा हे सन १९७७ मध्ये मयत असताना प्रॉपर्टीसाठी सन १९९७ साली त्यांच्या नावाने शपथपत्र केले असून त्यांचा खोटा अंगठा सुनिल बहिरा याने सदरच्या स्टॅम्पवर मारुन त्रयस्थ व्यक्ती गोविंद काथोर बहिरा असल्याचे भासवले.
मयत व्यक्तीला जिवंत दाखवत शपथपत्राचा फायदा घेऊन सुनिल बहिराने बांधकाम परवानगी मिळवली होती. या अनुषंगाने शासनाची गंभीर फसवणूक केल्याबद्दल विशाल पगडे यांनी पोलिसांकडे दाद मागितली. मागील महिन्यात दाखल झालेल्या गुन्हयाचा पाठपुरावा त्यांनी केल्याने अखेर सुनिल बहिरावर भादंवि कलम ४१७, ४६५, ४६७, ४६८, ४७१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्या अनुषंगाने आरोपी सुनिल बहिरा यास आज पनवेल न्यायालयात हजर केले असता गुन्ह्याचे गंभीर स्वरूप लक्षात घेता न्यायालयाने अधिक तपासासाठी त्याला पाच दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे.
शासनाची फसवणूक करणे हा संवेदनशिल गुन्हा असताना मागील महिन्यात तक्रार दाखल करूनही अटक करण्यास उशीर झाला असला तरी आम्ही झालेल्या कारवाईमुळे समाधान व्यक्त करत आहे. इतके गुन्हे असतानाही उजळ माथ्याने फिरण्याचे काम आरोपी करत होता. कायदा सुव्यवस्थेचा विचार करता अशा आरोपींना जरब बसली पाहिजे, असे मत तक्रारदाराने व्यक्त केले आहे. सदर बांधकामावर अनधिकृतरित्या टॉवर उभारल्याची देखील तक्रार ग्रामस्थांनी केलेली आहे.
फसवणूक करणे, दमदाटी करणे, मारहाण करणे अशा पद्धतीच्या अनेक तक्रारी सुनिल बहिरा यांच्यावर तक्का ग्रामस्थांनी केलेल्या आहेत. सुनिल बहिरा हे स्वतःच्या पूर्व पदाचा वापर करून तक्का आणि परिसरामध्ये निरनिराळ्या बांधकाम व्यावसायिकांना धमकावणे, त्यांच्याकडून जबरदस्तीने सप्लाय घेणे आणि ग्रामस्थांचा हक्क डावलणे याबाबतीत कुख्यात असून त्यांच्या या कारस्थानाला संपूर्ण ग्रामस्थ कंटाळले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई केल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास घेतला आहे.