पोलीस अधिकारी तुषार दोषी यांच्या बदलीस स्थगिती देण्याची दीपक केसरकर यांनी मागणी केली आहे. केसरकरांनी २० नोव्हेंबरलाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे. केसरकर यांनी अंतरवाली सराटी येथे झालेल्या लाठीहल्ल्याची चौकशी पूर्ण होईपर्यंत बदली आदेशास स्थगिती देण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे अतंरवाली सराटीतील लाठीहल्ल्यानंतर चौकशीच्या मागणीसाठी आझाद मैदानात सुरू असलेलं उपोषण सोडवताना केसरकर यांनी शिष्टाई केली होती.
तुषार दोषी यांची २० नोव्हेंबर २०२३ च्या गृह विभागाच्या आदेशानं पोलीस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य पुणे येथे बदली करण्यात आली होती. याबाबत मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केसरकर यांनी वास्तविक तुषार दोषी यांचेवर आंतरवली सराटी, जिल्हा जालना येथे मराठा अंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्यात दोषारोप ठेवण्यात आलेले आहेत. सद्यस्थितीमध्ये त्यांची याप्रकरणी चौकशी सुरू असल्याने ती पूर्ण होईपर्यंत त्यांचे बदली आदेशास स्थगिती देण्याबाबत विनंती आहे, असं म्हटलं आहे.
मनोज जरांगे यांचाही विरोध
तुषार दोषी यांच्या बदली आदेशानंतर मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी गृहविभागवर निशाणा साधला होता. मराठा आंदोलकांना मारल्याचे तुषार दोषी यांना बक्षीस मिळाले आहे. निष्पाप जनतेवर कट रचून ज्यांनी हल्ला केला त्यांना बढती मिळणार असेल तर याची माहिती घेईन. त्यांच्यावर न्यायालयीन चौकशी बसणार आहे. मात्र, यातून कोणालाही सुट्टी मिळणार नाही, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले होते.
Read Latest Maharashtra News And Marathi News