• Sat. Sep 21st, 2024
आवश्यकता वाटल्यास मुंबईत कृत्रिम पाऊस – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : मुंबईतील प्रदूषण रोखण्यासाठी आवश्यकता वाटल्यास कृत्रिम पाऊस पाडण्यात येईल. त्यासाठी मुंबई महापालिका दुबईस्थित कंपनीशी करार करेल. या कंपनीची कृत्रिम पाऊस पाडण्याबाबतची अचूकता जास्त आहे. त्यामुळे मुंबईतील हवेतील प्रदूषण कमी होईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी येथे दिली.

धूळ आणि वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली आहे. एकनाथ शिंदे यांनी प्रदूषण नियंत्रणात आणण्याचे आदेश यंत्रणाना दिले आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या कामाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री आणि महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल मंगळवारी मुंबईच्या रस्त्यांवर उतरले. शिंदे यांनी वांद्रे येथील कलानगर उड्डाणपुलापासून पश्चिम द्रुतगती महामार्गावरील जुहू तारा रस्त्यापर्यंत प्रदूषण नियंत्रणासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांची पाहणी केली. तसेच वांद्रे पूर्व आणि पश्चिम भागातील नागरिकांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. मुख्यमंत्र्यांनी पहाटे पश्चिम उपनगरांतील कलानगर जंक्शन, मिलन सबवे, टर्नर रोड, जॉगर्स पार्क आदी परिसरास भेट देऊन प्रदूषण नियंत्रणाच्या आणि स्वच्छतेच्या कामाची पाहणी केली.

शहरात मागील काही दिवसात वाढलेले प्रदूषणाचे प्रमाण नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकारकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. रस्त्यांवरील धूळ तसेच हवेतील धुलीकण कमी करण्यासाठी दिवसाआड पाणी फवारणी करण्याच्या त्याचप्रमाणे वॉटर फॉगर, जेटिंग मशिन, सक्शन मशिन, स्मॉग गन, आदींचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रस्ते धुण्यासाठी एक हजार टँकर भाड्याने घेण्यात येणार आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुंबईत राज्य सरकारच्या विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांबरोबरच अनेक बांधकामे सुरू आहेत. या कामांच्या ठिकाणी प्रदूषण होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. काम सुरू असलेल्या इमारतींना ग्रीन कव्हर अत्यावश्यक करण्यात आले आहे. डेब्रिज उघड्या वाहनांमधून नेण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. अर्बन फॉरेस्टचे क्षेत्र वाढवून शहरावरील ग्रीन कव्हर वाढविण्यात येणार आहे. हवेतील धुलीकण कमी करण्यासाठी शहरात ४० ठिकाणी वॉटर फॉगर आणि स्मॉग गन लावण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे मुख्य रस्त्यांबरोबरच छोटे रस्ते, गल्ल्या, नाले, समुद्र किनारे आदी ठिकाणी सुद्धा स्वच्छता ठेवण्याबाबत निर्देश देण्यात आल्याचेही ते म्हणाले.

शिंदे यांनी सुरुवातीला डी विभागामध्ये पेडर रोड येथे दुभाजक स्वच्छता कामाची पाहणी करून दौऱ्याची सुरुवात केली. एच पूर्व विभागामध्ये कलानगर, खेरवाडी जंक्शन, मराठा कॉलनी, मिलन भुयारी मार्ग परिसर; के पूर्व विभागामध्ये श्रद्धानंद मार्ग, दयालदास मार्ग, पायावाडी, मिलन उड्डाणपूल आणि त्यानंतर एच पश्चिम विभागामध्ये जुहूतारा रस्ता, लिंकिंग मार्ग आणि टर्नर मार्ग आदी ठिकाणी शिंदे यांनी रस्ते, पदपथ स्वच्छता तसेच धूळ प्रतिबंधक कामांची पाहणी केली. दौऱ्याच्या अखेरीस त्यांनी वांद्रे पश्चिम येथील कार्टर रस्ता स्थित जॉगर्स पार्क येथे भेट देऊन तेथील सुविधांची पाहणी केली.

स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत चहापान

मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वच्छतेची पाहणी करताना स्वच्छता करणाऱ्या कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत चहापान केले. शासनामार्फत स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या मुंबईतील सर्व ४६ वस्त्यांमध्ये संपूर्ण सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती त्यांनी कर्मचाऱ्यांना दिली. मुंबई स्वच्छ राखण्यामध्ये आपले महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे सांगून त्यांनी कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed