• Sun. Sep 22nd, 2024

आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य आणि केंद्र सरकार कटिबद्ध : राज्यपाल रमेश बैस

ByMH LIVE NEWS

Nov 21, 2023
आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य आणि केंद्र सरकार कटिबद्ध : राज्यपाल रमेश बैस

नाशिक, दिनांक 21 नोव्हेंबर, 2023 (जिमाका वृत्तसेवा): आदिवासी बांधवांना शिक्षित, कौशल्ययुक्त आणि सशक्त करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकार एकत्रितपणे योजना राबवित आहे. आदिवासी बांधवांमध्ये जनजागृती करून स्वच्छता अत्यावश्यक आर्थिक सेवा, वीज जोडणी, एलपीजी सिलिंडर, गरिबांसाठी घरे, अन्न सुरक्षा, योग्य पोषण, विश्वसनीय आरोग्य सेवा, अशा कल्याणकारी योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवणे हा ‘विकसित भारत संकल्प यात्रेचा’ मुख्य उद्देश असल्याचे प्रतिपादन, महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी आज इगतपुरी तालुक्यातील मोडाळे येथे केले.

मोडाळे येथे विकसित भारत संकल्प यात्रेनिमित्त आयोजित महाशिबीर कार्यक्रमाचे उदघाटन राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी श्री. बैस बोलत होते. यावेळी पालकमंत्री दादाजी भुसे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार हिरामण खोसकर, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, राज्यपालांच्या सचिव श्वेता सिंघल, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी.जी.शेखर पाटील, जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल उपस्थित होते.

शासनाने आदिवासी भागात ‘सिकल सेल ॲनिमिया’ निर्मूलन मोहीम सुरू केली असून एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये नावनोंदणी, शिष्यवृत्ती योजना, वन हक्क मालकी, वैयक्तिक आणि सामुदायिक जमीन,  वन धन विकास केंद्र, आदिवासी भागातील विशिष्ट समस्यांकडेही लक्ष दिले जात असल्याचे श्री. बैस यांनी सांगितले. मुंबई आणि पुण्यासह नाशिक जिल्हा ‘सुवर्ण त्रिकोण’ म्हणून ओळखला जात असला तरी नाशिकच्या आदिवासी भागातील कुपोषण  निमूर्लनासाठी उपाययोजना करुन पुढील 5 वर्षात जिल्हा कुपोषणमुक्त करावा असे आवाहन, राज्यपाल रमेश बैस यांनी जिल्हा प्रशासनाला केले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘टीबीमुक्त भारत’ मोहिमेला लोकांचा मोठा पाठिंबा मिळाला आहे.निक्षय मित्र’ बनण्यासाठी हजारो नागरिक पुढे आले आणि क्षयरुग्णांच्या पोषण आहाराची जबाबदारी स्वीकारली. या मोहिमेप्रमाणेच  प्रयत्न केल्यास लोक कुपोषणाने पीडित कुटुंबांना मदत करण्यासाठी पुढे येतील, असा विश्वास ही त्यांनी यावेळी व्यक्त केला. शिक्षण हा प्रगतीचा आधारस्तंभ असून आदिवासी तरुणांना प्रगत शैक्षणिक संधींद्वारे सक्षम करण्यासाठी शासन वचनबद्ध असल्याचे श्री. बैस  यांनी सांगितले.

विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून आयुष्मान भारत, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना, दीनदयाल अंत्योदय योजना – राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान,  प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना,  प्रधानमंत्री विश्वकर्मा,  प्रधानमंत्री किसान सन्मान, किसान क्रेडिट कार्ड (KCC),  प्रधानमंत्री पोषण अभियान, हर घर जल-जल जीवन मिशन, जन धन योजना, अटल पेन्शन योजना, नॅनो फर्टिलायझर्स इत्यादी योजनांची माहिती शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवावी लागेल. यामध्ये लोकसहभाग खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी योजनांची माहिती तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी सहभाग वाढवून यात्रा यशस्वी करावी, असे आवाहनही राज्यपाल श्री. बैस यांनी केले.

आदिवासी बांधवांचे आदरातिथ्य व नृत्याने राज्यपाल श्री बैस  भारावले त्यांनी या आदिवासी बांधवांचे कौतुक करून आभार मानले. कार्यक्रमाच्या ठिकाणी शासकीय योजनांचे विविध स्टॉल लावण्यात आले होते, या स्टॉलला राज्यपाल रमेश बैस व मान्यवरांनी भेट देऊन पाहणी केली.

विकसित भारत संकल्प यात्रा यशस्वी करू: पालकमंत्री दादाजी भुसे
भगवान बिरसा मुंडा यांनी लहान वयात इंग्रजांविरूद्ध बंड करून आदिवासी बांधवांना न्याय मिळवून दिला आहे.  हाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून विकासित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून हमारा संकल्प, हमारा भारत हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा विचार पुढे नेणार असल्याची ग्वाही, पालकमंत्री दादाजी भुसे यांनी दिली. तसेच बचतगटांना बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी शंभर ठिकाणे अंतिम केली असून ग्रामीण भागातील  मुलांना उच्च शिक्षण घेता यावे सुपर 50 या उपक्रमात सकारात्मक बदल करुन सुपर 100  उपक्रम राबविता येणार आहे. तसेच गोर गरीबांच्या मुलांना जिल्हा परिषद शाळेतून चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी 125 शाळा मॉडेल स्कूल करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री श्री.भुसे यांनी सांगितले. शासकीय सर्व योजनांची माहिती तळागाळापर्यंत  पोहचविण्यासाठी सर्वांचा सहभाग वाढवून यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासनही पालकमंत्री दादाजी भुसे यांनी दिले.

आदिवासी बांधवांच्या विकासासाठी सर्वंकष प्रयत्न आवश्यक: उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ
इगतपुरी तालुक्यात पावसाचे  प्रमाण मोठ्या प्रमाणावर असून धरणांमध्ये पाणीसाठाही आहे. परंतू येथील पाणी पिण्यासाठी राखीव असल्याने शेती व्यवसायासाठी पाणी उपलब्ध होत नाही, त्यामुळे या भागात नवीन  पाणीसाठे तयार करणे आवश्यक आहे. तसेच आदिवासी बांधवांच्या मालाला बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी शहरातील मॉल मध्ये जागा मिळावी, यासाठी शासनस्तरावर प्रयत्न व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त करून  पर्यटनासाठी इगतपुरी तालुक्याचा परिसर उत्तम असल्याने पर्यटन वाढीसाठी स्टे-होम सारख्या संकल्पना राबविण्यात याव्यात, असेही मत श्री. झिरवाळ यांनी यावेळी व्यक्त केले.

यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा आपल्या प्रास्ताविकात म्हणाले, केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांची माहिती व लाभ नागरिकांपर्यंत पोहोचावेत, या उद्देशाने ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ ही देशव्यापी मोहीम केंद्र सरकारकडून सुरू करण्यात आली आहे. जनजातीय गौरव दिनाच्या दिवशी 15 नोव्हेंबर, 2023 रोजी या यात्रेचा शुभारंभ  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते खुंटी (झारखंड) येथे झाला आहे. या यात्रेमार्फत ग्रामस्वराज्य अभियान राबविले जाणार असून अद्यापही ज्या

योजनांचे लाभ लक्षित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचलेले नाहीत. अशा लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने विकसित भारत संकल्प यात्रा देशव्यापी मोहीम केंद्र शासनाकडून 26 जानेवारी 2024 पर्यंत राबविण्यात येणार आहे. विकसित भारत संकल्प यात्रेचा उद्देश विविध योजनांतर्गत पात्र असलेल्या परंतू आतापर्यंत लाभ न घेतलेल्या लोकांपर्यत पोहोचवणे, योजनांचा प्रसार आणि योजनांबद्दल नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करणे. नागरिकांशी संवाद-वैयक्तिक कथा, अनुभव शेअरिंगद्वारे सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधणे. आणि यात्रेदरम्यान निश्चित केलेल्या तपशिलांद्वारे संभाव्य लाभार्थ्यांची नोंदणी करणे असा आहे, असे जिल्हाधिकारी यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले.

राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते झाले विविध योजनांच्या लाभांचे वाटप

कृषी विभाग
1)गेणू दगडू मंडोळे, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेतून नवीन विहीर लाभ
2)चंद्रकांत रघुनाथ सोनवणे, मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेतून व्यक्तीगत शेततळे लाभ
3) आकांक्षा अक्षय पवार, पीएमकेएसवाय योजनेतून फळबाग लागवड (डाळिंब) लाभ

आरोग्य विभाग
1) नवनाथ सावळीराम झोले, आभा कार्ड लाभ
2) गणेश निवृत्ती शिंदे, आभा कार्ड लाभ
3) शंकर काशिनाथ लहानगे, आभा कार्ड लाभ
4) सखुबाई वाळू कन्हाव, आयुष्यमान कार्ड लाभ
5) सोमनाथ बबन शिंदे, आयुष्यमान कार्ड लाभ
6) लहानु पांडू सराई, आयुष्यमान कार्ड लाभ

बँक ऑफ महाराष्ट्र
1) सोमनाथ निवृत्ती खराडे, किसान क्रेडीट कार्ड लाभ
2) काशिनाथ दत्तात्रय गव्हाणे, किसान क्रेडीट कार्ड लाभ
3) गोविंद पिराजी मेडाडे, किसान क्रेडीट कार्ड लाभ

एकात्मिक बालविकास योजना
1)उषा अनिल बोडके, टीएचआर वाटप (गरोदर माता)
2) अंकिता भगवान ढोन्नर,  बेबी केअर किट वाटप (स्तनदा माता)

क्रीडा पुरस्कार
1) रिंकी पावरा, सिल्वर मेडलिस्ट (5000 MTRS walking -world university Games chaina 2023)
2)किसन तडवी, गोल्ड मेडलिस्ट (3000 MTRS walking -Youth Asian Games)

शेतीस उद्योगाचा दर्जा देण्यासाठी शासन प्रयत्नशील :राज्यपाल रमेश बैस

मी स्वत: शेतकरी पुत्र असून शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी मी येथे आलो आहे असे सांगून शेतीस उद्योगाचा दर्जा देण्यासाठी शासन सदैव प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले. आज इगतपुरी तालुक्यातील शिरसाटे गावात विकसित भारत संकल्प यात्रा अंतर्गत कृषी विभागामार्फत ड्रोनद्वारे नॅनो युरिया फवारणी प्रात्यक्षिक कार्यक्रमाच्यावेळी राज्यपाल रमेश बैस बोलत होते.

यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार हिरामण खोसकर,   विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक बी. जी. शेखर पाटील, राज्यपालांच्या सचिव श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास नाशिक चे प्रकल्प अधिकारी जितीन रेहमान, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विवेक सोनवणे, कृषी विकास अधिकारी कैलास शिरसाट, तालुका कृषी अधिकारी रामदास मडके, गटशिक्षण अधिकारी निलेश पाटील यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

यावेळी शिरसाटे गावातील प्रगतशील शेतकरी राजेंद्र केदार यांच्या शेतातील टोमॅटो पिकावर ड्रोनद्वारे नॅनो युरिया फवारणी प्रात्यक्षिक राज्यपाल रमेश बैस यांच्यासमोर सादर करण्यात आले. यावेळी इफको चे क्षेत्र अधिकारी निमिश पवार, कृषी विज्ञान केंद्र मुक्त विद्यापीठाचे प्रशिक्षण सहयोगी हेमराज राजपूत यांनी नॅनो युरिया फरवाणी बाबतची तांत्रिक माहिती व फायदे यावेळी राज्यपाल रमेश बैस यांना विषद केले.

राज्यपाल रमेश बैस यांनी शिरसाटे गावातील शेतकरी भास्कर मते व राजेंद्र केदार यांच्याशी संवाद साधत सेंद्रीय शेती व उत्पादिते, शेती करतांना येणाऱ्या समस्या, वीज व पाणी समस्या, पीक पध्दती याबाबत मुक्त संवाद साधून शेतीतील अडी अडचणी जाणून घेतल्या.

यावेळी ज्ञानदा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, मोडाळे, ता. इगतपुरी येथील विद्यार्थ्यांना राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते मानव विकास मिशन अंतर्गत सायकलचे वाटप करण्यात आले.
या विद्यार्थ्यांना मिळाला लाभ
१) समाधान बच्चु भुरबुडे
२) उमेश लहानु सराई
३) सोमनाथ भोरू सराई
४) गोरख मल्लू सराई
५) सागर प्रकाश सराई

0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed