रविवारी सायंकाळी शेंडी-पोखर्डी गावाच्या सोशल मीडिया ग्रूपवर जरांगे पाटील यांच्याविषयी एकाने पोस्ट केली होती. जरांगे पाटील यांच्या मागे कोण आहे? असा प्रश्न करून पोस्टकर्त्यानेच त्याचे उत्तर आम्ही सर्व असे दिले होते. यावर सरपंच महिलेने जरांगे पाटील यांच्याविषयी घाणेरडी कॉमेंट केली. यामुळे मराठा समाजातून संताप व्यक्त करण्यात आला. ही माहिती नगरसह सर्व ठिकाणच्या सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांना समजली. यामुळे वातावरण तापले. पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचा निर्णय झाला. त्यानुसार सीताराम दाणी (रा. शेंडी, ता. नगर) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. शेंडी-पोखर्डी वार्ता नावाच्या ग्रुपमध्ये अक्षय भगत यांनी मनोज जरांगे यांच्याविषयी लिहिलेल्या पोस्टवर या महिलेने घाणेरडी व आक्षेपार्ह कॉमेंट लिहिल्याने समाजाच्या भावना दुखावल्याचे तसेच तेढ निर्माण झाल्याचे फिर्यादित म्हटले आहे. एमआयडीसी पोलिसांनी त्या महिलेविरूद्ध गुन्हा दाखल केला.
दरम्यान, यामुळे शेंडी गावात रविवारी सकाळपासून तणावपूर्ण शांतता आहे. गावातील व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. गावातील तसेच नगर शहर व आसपासच्या गावांतून सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते शेंडी गावात एकत्र येत आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गावात बंदोबस्त वाढविला आहे. नगर जिल्ह्यात सध्या जमावबंदीचा आदेश लागू आहे, याची माहितीही कार्यकर्त्यांना देण्यात येत आहे.