• Mon. Nov 25th, 2024
    ‘आरक्षण संपवण्याचा घाट’ बसपच्या मेळाव्यात भाजप, काँग्रेसवर चौफेर हल्ला

    नागपूर : ‘सरकारी नोकऱ्या व कंपन्यांचे खासगीकरण करून राज्यकर्ते आरक्षण संपुष्टात आणत आहेत’, असा आरोप बहुजन समाज पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आनंदकुमार यांनी केला. येत्या निवडणुकीत केंद्रातील भाजप सरकारला पायउतार करण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहनही त्यांनी केले.

    बसपचा शुक्रवारी सुरेश भट सभागृहात मेळावा झाला. यावेळी बोलताना आनंदकुमार यांनी काँग्रेस आणि भाजपवर चौफेर हल्ला चढवत केंद्र व राज्य सरकारवर जोरदार टीका केली. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो’, ‘कांशीराम यांचा विजय असो’, ‘मायावती जिंदाबाद’ अशा घोषणांनी सभागृह दणाणून गेले. व्यासपीठावर राष्ट्रीय समन्वयक माजी खासदार अशोक सिद्धार्थ, नितीन सिंग, प्रदेश सरचिटणीस नागोराव जयकर यांच्यासह मोठ्या प्रमाणात पदाधिकारी उपस्थित होते. यानिमित्त ग्रेट नाग रोड तसेच सभागृहाच्या परिसरात पक्षाचे झेंडे लावून बसपमय वातावरण तयार करण्यात आले होते. मेळाव्यास राष्ट्रीय समन्वयक आकाश आनंद येणार होते. मात्र, प्रकृती अस्वास्थामुळे ते येऊ शकले नाहीत, असे प्रदेशाध्यक्ष ॲड. संदीप ताजने यांनी स्पष्ट केले.

    ‘केंद्र व राज्य सरकारे जातीयवाद पसरवत आहेत. भांडवलदारांसाठी त्यांचे काम चालले आहे. या पक्षांचे सरकार असेपर्यंत विकास होणार नाही आणि आरक्षण व इतर सोयींचा लाभही मिळणार नाही’, असेही आनंदकुमार म्हणाले.

    ‘पक्षाला कमकुवत करण्याचे प्रयत्न सातत्याने होतात. त्यापासून सावध राहावे. मध्य प्रदेशातील मतदानापूर्वी बसपला मतदान म्हणजे भाजपला मत, अशी अफवा पसरवण्यात आली. अशा कोणत्याही चर्चेतून कार्यकर्त्यांनी गैरसमज करून घेऊ नये. राज्यघटनेचे रक्षक म्हणवून घेणाऱ्या काँग्रेसवर कसा विश्वास ठेवणार? पक्षाबद्दल लोकांमध्ये संभ्रमाचे वातावरण काँग्रेस असो की भाजप किंवा राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेकडूनही होऊ शकते’, असा आरोपही आनंदकुमार यांनी केला. पक्षात निम्मे पदाधिकारी तरुण ठेवा आणि त्यांनाच संधी द्या, अशी सूचनाही त्यांनी केली.

    ‘गेल्या चार निवडणुकांमध्ये झाले नाही ते येत्या निवडणुकीत होईल. काँग्रेस असो वा भाजप, कुणीही सत्तेत असले तरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कांशीराम यांचा अवमान केला जातो. राज्यातून मायावती व आकाश आनंद यांना राज्यातून पूर्ण शक्ती द्यावी’, असे आवाहन संदीप ताजने यांनी केले.

    व्यासपीठावर नानाडी देवदडे, प्रदेश सचिव पृथ्वीराज शेंडे, राजू भांगे, विजयकुमार डहाट, चंद्रकांत मांझी, अविनाश वानखेडे, सुशील वासनिक, मीडिया प्रभारी उत्तम शेवडे, जय मेश्राम, शादाब खान उपस्थित होते. प्रदेश प्रभारी ॲड. सुनील डोंगरे यांनी संचालन केले. जिल्हाध्यक्ष ओपुल तामगाडगे यांनी आभार मानले.

    मायावतींनीच घेतला पुढाकार!

    राज्यघटना धोक्यात आहे, असे काँग्रेस वारंवार सांगत असली तरी त्यांनी घटनेनुसार काम केले नाही. अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्गीयांना योग्य प्रमाणात आरक्षण का दिले नाही. अनुशेषानुसार एकही जागा भरली नाही. खासगी क्षेत्र, सरकारी कामात कोणतेही आरक्षण दिले नाही. मायावती यांनीच आरक्षण दिले, असा दावा अशोक सिद्धार्थ यांनी केला.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed