नाशिकमध्ये काही वर्षांपूर्वी हिऱ्यांविषयी फार जागृती नव्हती. त्यामुळे लोक सोने-चांदी खरेदीलाच प्राधान्य देत असत. गुंतवणुकीसाठीही त्यांचाच विचार केला जात असे. मात्र, शहरात नामवंत ब्रॅण्ड्सचे शोरूम दाखल झाल्यानंतर हिऱ्यांचे व्यवहार वाढले. सध्या नाशिकमध्ये चार हजार रुपयांपासून ते लाखो रुपयांपर्यंतचे हिरे उपलब्ध आहेत. शहरातील बहुतांश हिरे सुरत व मुंबईतून येतात. ग्राहकांच्या मागणीमुळे आता शहरातील बहुतांश सराफी पेढ्यांवर हिऱ्यांचे दागिने उपलब्ध करून दिले जातात. ‘कट’, ‘क्लिअॅरिटी’, ‘कलर’ व ‘कॅरेट’ या चार ‘सी’च्या निकषांनी हिऱ्याची पारख केली जाते व किंमत ठरवली जाते. जेमोलॉजिकल इन्स्टिट्यूट ऑफ अमेरिका (जीआयए) यासारख्या मोजक्या संस्थांकडून हिऱ्याची पारख होते. दागिन्यात हिरा घट्ट बसावा, यासाठी जरा कठीण सोने आवश्यक असते. त्यामुळे हिऱ्यासाठीचे दागिने शक्यतो १८ कॅरेट सोन्यामध्ये घडवले जातात. मागील काही काळापासून रोझ गोल्ड व प्लॅटिनममध्येही हिऱ्याचे दागिने साकारले जात आहेत, असे सराफ व्यावसायिकांनी सांगितले.
या दागिन्यांना सर्वाधिक मागणी…
हिऱ्याच्या दागिन्यांपैकी सध्या सर्वाधिक मागणी महिलांच्या अंगठ्यांना (लेडीज रिंग) आहे. त्या खालोखाल मुरणी, नेकलेस, कानातले, पेंडंट सेट यांची खरेदी केली जाते. तरुणाईमध्ये हिऱ्याच्या दागिन्यांची क्रेझ वाढली असून, बजेटमध्ये बसणारे दागिने खरेदी केले जात आहेत.
हौस, वेगळे काही भेट देणे, ज्योतिषांचा सल्ला, गुंतवणूक आदी कारणांमुळे हिऱ्यांचे दागिने खरेदी केले जातात. गेल्या काही वर्षांत नाशिकमध्ये हिऱ्यांच्या खरेदीचा ट्रेण्ड वाढला असून, मुंबई व सुरत जवळ असल्याने भविष्यात आणखी विस्ताराच्या संधी आहेत.-गिरीश नवसे, अध्यक्ष, सराफ असोसिएशन
छोट्या दागिन्यांपासून ते ब्रायडल सेटपर्यंत हिऱ्याच्या दागिन्यांना मागणी आहे. सोन्याच्या तुलनेत हिऱ्याच्या किमतीही मध्यमवर्गीयांच्या आवाक्यात आल्या आहेत. लोक गुंतवणुकीपेक्षा हौस व फॅशन म्हणून हिऱ्याचे दागिने खरेदी करीत आहेत. गेल्या दोन-तीन वर्षांत हिऱ्याबाबत जागृती वाढली आहे.-मयूर शहाणे, संचालक, मयूर अलंकार