कांदिवलीच्या लोखंडवाला परिसरातील महाराणा प्रताप उद्यानात मागील १० वर्षांपासून काँग्रेसचे माजी नगरसेवक राजपत आणि अजंता यादव हे दाम्पत्य त्यांच्या राजपत सेवा मंडळातर्फे छटपूजा आयोजित करतात. भाविकांना दूर समुद्रकिनारी जाऊन पूजा करावी लागू नये, यासाठी त्यांनी या उद्यानात सात छट कुंड उभारली आहेत. यंदाही छटपूजेच्या आयोजनासाठी त्यांनी पालिकेकडे परवानगी मागितली होती. ६ नोव्हेंबरला पालिकेने परवानगी दिल्यावर त्यांनी अनामत रक्कम म्हणून एक लाख रुपयेही भरले. त्यानंतर अचानक पालिकेने राजपत सेवा मंडळाला परवानगी नाकारली. स्थानिक आमदार अतुल भातखळकर यांच्या सांगण्यावरून ही परवानगी नाकारल्याचा मुंबई काँग्रेसचा आरोप आहे.
‘भाजप आणि शिंदे सरकार त्यांच्या राजकीय स्वार्थापोटी नागरिकांच्या श्रद्धेशी खेळ करत आहे. रामलीलेच्या वेळीही सरकारने रावणवध एक दिवस आधीच करायला सांगितला. आता छटपूजेतही सरकार विघ्न आणत आहे. पण काँग्रेस या धमकावणीला घाबरणार नाही. आम्ही छटपूजा तिथेच आयोजित करणार’, असे गायकवाड यांनी याबाबत भूमिका मांडताना नमूद केले.