• Mon. Nov 25th, 2024
    मुंबई विमानतळाने मोडला २०१८चा विक्रम, २४ तासांत ये-जा करणाऱ्या विमानांचा आकडा वाचून थक्क व्हाल

    मुंबई : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाने सर्वाधिक विमान वाहतूक हाताळणीचा विक्रम केला आहे. दिवाळीदरम्यान ११ नोव्हेंबर, २०२३ रोजी दिवसभरात १,०३२ विमानांची ये-जा या विमानतळावर झाली. याद्वारे विमानतळाने डिसेंबर २०१८चा स्वत:चाच सर्वाधिक प्रवासीसंख्येचा विक्रम मोडला.

    करोना संकटाआधी मुंबईचे हे विमानतळ देशात सर्वाधिक व्यग्र होते. विमानतळावरून ९ डिसेंबर, २०१८ रोजी १,००४ विमानांची विक्रमी ये-जा झाली होती. त्यानंतर मागील महिन्यापर्यंत विमानोड्डाणांची संख्या टप्प्याटप्प्याने ९३० दरम्यान पोहोचली होती. अलिकडेच ऑक्टोबर २०२३ ते ३१ मार्च, २०२४ दरम्यानच्या हिवाळी वेळापत्रकात दैनंदिन ९५० उड्डाणे निश्चित झाली आहेत. हा आकडा मागील वर्षीच्या हिवाळी वेळापत्रकाच्या तुलनेत आठ टक्के अधिक होता. मागील हिवाळी वेळापत्रकात २४ तासांतील नियोजित उड्डाणे ८७१ इतकी होती. तर याआधीच्या उन्हाळी वेळापत्रकात (मार्च-ऑक्टोबर २०२३) हा आकडा ९३१ इतका होता. त्यानंतर आता दिवाळीच्या निमित्ताने वाढत्या प्रवासीसंख्येत नियोजित ९५० उड्डाणांखेरीज एकूण १,०३२ उड्डाणे २४ तासांत झाली.

    विमानतळ चालविणाऱ्या मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडने (मिआल) दिलेल्या माहितीनुसार, विमानतळाने ११ नोव्हेंबरला १,०३२ उड्डाणे हाताळली. याद्वारे विक्रमी १ लाख ६१ हजार ४१९ प्रवाशांनी प्रवास केला. त्यामध्ये १ लाख ७ हजार ७६५ देशांतर्गत व ५३ हजार ६८० आंतरराष्ट्रीय प्रवाशांचा समावेश होता. यंदा दिवाळीच्या ११ ते १३ नोव्हेंबर या तीन दिवसांत एकूण २,८९४ विमानोड्डाणांची हाताळणी विमानतळाने केली. त्यामध्ये २,३१७ देशांतर्गत; तर ७५७ आंतरराष्ट्रीय उड्डाणांचा समावेश होता. या तीन दिवसांतील प्रवासीसंख्या ५ लाख १६ हजार ५६२ इतकी असून त्यामध्ये ३ लाख ५४ हजार ५४१ देशांतर्गत व १ लाख ६२ हजार २१ इतक्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचा समावेश होता. दिवाळीदरम्यान (११ ते १३ नोव्हेंबर) दिल्ली, बेंगळुरू, चेन्नई या देशांतर्गतसह दुबई, लंडन, अबुधाबी व सिंगापूर या विमानतळांसाठीच्या प्रवाशांची संख्या सर्वाधिक होती.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed