मुंबई, दि. ९ : राज्यातील अनुदानित वसतिगृहांचा अनुदान प्रश्न मार्गी लागला आहे. या वसतिगृहांना अनुदान मिळणार असल्याची माहिती, सामाजिक न्याय विभागाने दिली आहे. शासन स्तरावरून निधीचे वितरण झाले असून क्षेत्रीय कार्यालयांना निधी वितरणाची कार्यवाही सुरू आहे.
राज्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती तसेच विजाभज, इमाव घटकातील विद्यार्थ्यांसाठी विभागामार्फत स्वयंसेवी संस्था संचलित वसतिगृहांची योजना राबविण्यात येते. राज्यात एकूण २३८८ अनुदानित वसतिगृहे आहेत. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून या वसतिगृहांना निवासी विद्यार्थ्यापोटी दरमहा प्रति विद्यार्थी १५०० रुपये इतके परिपोषण अनुदान देण्यात येते. या वसतिगृहातील कर्मचाऱ्यांना अधीक्षक- १० हजार रुपये ,स्वयंपाकी ८५०० रुपये, मदतनीस ७५०० रुपये, तर चौकीदार ७५०० रुपये याप्रमाणे दरमहा मानधन देण्यात येते. तसेच, सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रमाणित केल्याप्रमाणे वसतिगृहाच्या जागेच्या क्षेत्रफळानुसार अनुज्ञेय रकमेच्या ७५ टक्के इतकी रक्कम स्वयंसेवी संस्थेस भाड्याची रक्कम म्हणून देण्यात येते.
०००
शैलजा पाटील/विसंअ