• Sun. Sep 22nd, 2024

काकाचे मोबाइल हॅक करुन व्हिडिओ पाहायचा, वैयक्तिक डेटा चोरुन डिलीट केला अन् मग…

काकाचे मोबाइल हॅक करुन व्हिडिओ पाहायचा, वैयक्तिक डेटा चोरुन डिलीट केला अन् मग…

म. टा. प्रतिनिधी, नाशिक: गावाकडे राहणाऱ्या काकांनी पुतण्याच्या मदतीने मोबाइलमध्ये ई-मेल सुरू केल्यावर पुतण्याने केलेल्या तांत्रिक गौडबंगालातून थेट ‘डेटा’ चोरी करून डिलिट केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. काकाच्या मोबाइलमध्ये स्वत:चा मोबाइल क्रमांक ‘ई-मेल’ला जोडून दोन मोबाइल ‘हॅक’ केल्याने सायबर पोलिसांत पुतण्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपक सुभाषचंद्र कुलकर्णी (३७, रा. उत्तमनगर, सिडको) असे संशयिताचे नाव आहे.

चाळीसगावात उमेश मधुसुदन कुलकर्णी (वय ५६) यांनी नाशिक सायबर पोलिसांत फिर्याद दिली आहे. उमेश हे चाळीसगावात पौराहित्य करतात. त्यांचा पुतण्या दीपक याने १३ ऑगस्ट २०२३ रोजी उमेश यांचे दोन मोबाइल हॅक केले. उमेश यांच्या मोबाइलमधील संपर्क क्रमांकासह वैयक्तिक छायाचित्रे, व्हिडीओ आणि इतर महत्त्वाचा डेटा डिलिट केला. त्यावरून उमेश यांनी पुतण्याविरोधात फिर्याद दिली.

समोर धुकं, खाली नदी, चालकाचं नियंत्रण सुटलं अन् बस पुलावरुन थेट नदीत कोसळली, कोल्हापुरात भयंकर दुर्घटना
दरम्यान, उमेश यांच्या मोबाइलमध्ये काही महिन्यांपूर्वी ई-मेल खाते सुरू करायचे होते. त्यावेळी त्यांनी पुतण्याची मदत घेतली. पुतण्याने काकांना ई-मेल सुरू करून देतांना तिथे ‘टू-स्टेप व्हिरिफिकेशन’मध्ये स्वत:चा मोबाइल क्रमांक नोंदविला. त्यामुळे एका प्रकारे काकाच्या मोबाइलचा ‘अॅक्सेस’ ई-मेलच्या माध्यमातून पुतण्याकडेही राहिला. फिर्यादी हे त्यांच्या मोबाइलमध्ये संपर्क क्रमांक, फोटो, व्हिडीओ किंवा इतर डेटा संकलित करीत होते. या संपूर्ण डेटाचा ‘बॅकअप’ ई-मेल ड्राइव्हवर सेव्ह होत राहिला. हा डेटा पुतण्या स्वत:च्या क्रमांकावरून ई-मेल उघडून नाशिकमध्ये बघायचा. त्याने ऑगस्ट महिन्यात अचानक काकांच्या दोन्ही मोबाइलमधील डेटा ई-मेलच्या माध्यमातून डिलिट केला. ही बाब फिर्यादीच्या लक्षात आल्यावर त्यांनी सायबर पोलिसांत फिर्याद दाखल केली.

अशी घ्या काळजी

– स्वत:चा मोबाइल शक्यतो कोणाच्याही हातात देऊ नका

– मोबाइलमधील ई-मेल किंवा इतर अॅप इतरांना हाताळू देऊ नका

– ई-मेलमध्ये स्वत:चाच क्रमांक नोंदविला आहे का, याची खात्री करा

– ई-मेलवर डेटा सेव्ह होत असल्यास त्यासंदर्भात सातत्याने अपडेट घ्या

– डेटा लिक झाल्याबाबत अथवा डिलिट झाल्याबाबत संशय आल्यास सर्च इंजिनची ‘हिस्ट्री’ तपासा

– मोबाइलमधील नवीन फंक्शन्ससंदर्भात माहिती घेताना विश्वासातील नातलग अथवा एक्सपर्टचीच मदत घ्या

– ई-मेल व मोबाइलचा पासवर्ड प्रत्येक तीन महिन्यांनी बदला

बांगलादेशच्या मातीत सोनं, कांदिवलीचा सीए भुलला, ३० लाख रुपयांचा गंडा
Read Latest Maharashtra News And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed