• Sat. Sep 21st, 2024

पुण्याचे पाणी पळवणार? टेंभू योजनेच्या विस्तारासाठी आठ टीएमसी वळविण्याचा प्रस्ताव

पुण्याचे पाणी पळवणार? टेंभू योजनेच्या विस्तारासाठी आठ टीएमसी वळविण्याचा प्रस्ताव

पुणे : खडकवासला, भाटघर, वीर, नीरा देवधर आणि पवना या धरणांमधील अतिरिक्त आठ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी सोलापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यासाठीच्या विस्तारित टेंभू योजनेसाठी देण्याच्या निर्णयाचा घाट घालण्यात येत आहे. या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यास भविष्यात पुणे शहर आणि जिल्ह्याला फटका बसणार आहे. पाणी पळविण्याच्या या प्रकारास उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यासह सर्वपक्षीय नेते पुण्याचे मान्यता देणार का, असा प्रश्न विचारण्यात येत आहे.

लोकप्रतिनिधी लक्ष घालणार का?

टेंभू विस्तारित पाणी योजनेला मंजुरी देण्यासाठी सांगली आणि सातारा जिल्ह्यातील नेत्यांनी नुकताच उपोषणाचे हत्यार उपसले होते. प्रत्यक्षात जे पाणी देता येणेच शक्य नाही, अशा भीमा खोऱ्यातील पाणी कागदोपत्री या योजनेसाठी देण्याचा घाट निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घालण्यात आला आहे. उच्चपदस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शासनस्तरावर या पाणीवाटपाला मंजुरी देण्यात आली असून, केवळ मंत्रिमंडळाच्या बैठकीची औपचारिकता बाकी आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह स्थानिक आमदारांनी वेळीच लक्ष घातले नाही; तर पुणे जिल्ह्याला या निर्णयाची मोठी किंमत चुकवावी लागेल, अशी भीती व्यक्त होत आहे.

भीमा हे तुटीचे खोरे

कृष्णा हे मुबलक पाणी असलेले; तर भीमा हे पाणी तुटीचे खोरे आहे. टेंभू विस्तारित योजनेचे लाभार्थी गावे कृष्णा खोऱ्यातील आहेत. या योजनेसाठी आठ टीएमसी पाण्याची आवश्यकता असून, तेवढे पाणी कृष्णा खोऱ्यात उपलब्ध नाही. त्याचवेळी भीमा खोऱ्यात पिण्याच्या पाण्याचे नियोजन केल्यानंतर राहणारे अतिरिक्त पाण्यातून आठ ‘टीएमसी’ पाणी या योजनेसाठी देण्याचा प्रस्ताव शासन स्तरावर मंजूर करण्यात आला आहे.
डायबेटिसग्रस्त विद्यार्थ्यांना वर्गात खाण्याची सवलत, जादा सोयीसुविधा देण्याचा शिक्षण विभागाचा निर्णय
कागदोपत्री पाणी वाटप?

राज्य सरकारने विस्तारित टेंभू उपसा सिंचन योजनेसाठी भीमा खोऱ्यातील पाणी देण्याचा निर्णय घेतला असला, तरी प्रत्यक्षात मात्र हे पाणी या योजनेला कसे पोहोचणार, याचे उत्तर जलसंधारण विभाग, राज्य सरकारकडे उपलब्ध नाही. हे पाणी केवळ कागदोपत्री देण्याचा घाट घालण्यात आला आहे. शासन स्तरावर हा निर्णय झाला असला, तरी त्याला अद्याप मंत्रिमंडळाची मंजुरी मिळालेली नाही.

भीमा खोऱ्यातून पाणी

कृष्णा पाणी तंटा लवादानुसार कृष्णा खोऱ्याला ५९९ टीएमसी पाणी वापरण्याची परवानगी आहे. त्यातील भीमा खोऱ्याचा वाटा हा सुमारे ३३३ टीएमसी आहे. तर, उर्वरित २६६ टीएमसी पाणी कृष्णा खोऱ्याकडे आहे. कृष्णा खोऱ्यात आतापर्यंत झालेले पाणीवाटप पाहता विस्तारित टेंभू योजनेला देण्यासाठी लागणारे आठ टीएमसी पाणी तेथे उपलब्ध नाही. त्यामुळे कागदोपत्री ते पाणी भीमा खोऱ्यातून नेण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यामुळे तुटीच्या असलेल्या भीमा खोऱ्यातील पाणी मुबलक कृष्णा खोऱ्याला देण्याचा प्रकार करण्यात आला आहे.
मी मेलेलो नाही… स्वतःलाच जिवंत सिद्ध करण्यासाठी लागली तीन वर्ष, शेतकऱ्याची हादरवणारी गोष्ट
विस्तारित टेंभू योजना

– विस्तारित टेंभू उपसा सिंचन योजनेमध्ये सोलापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यातील ११० गावांतील शेती सिंचनाखाली आणण्यात येणार आहे.
– टेंभू योजनेतून वंचित राहिलेल्या गावांना या विस्तारित योजनेद्वारे पाणी देण्यात येणार आहे.
– या योजनेद्वारे ४८ हजार एकर शेती ओलिताखाली येणार आहे.
– यासाठी आठ ‘टीएमसी’ पाण्याची आवश्यकता आहे.

भविष्याच्या नियोजनावर परिणाम

पुणे, पिंपरी-चिंचवड शहरांतील वाढली लोकसंख्या, जिल्ह्यातील वाढते शहरीकरण यामुळे पुण्याची तहान वाढत आहे. त्यातच पुरंदर, दौंड आणि इंदापूर तालुक्यातील दुष्काळी गावांची संख्या लक्षणीय असून, तेथेही भविष्यात पाणीयोजनांची आवश्यकता आहे. अशा परिस्थितीत भविष्यात दोन्हीही शहरांसह या तालुक्यांना पाणीयोजना राबविण्याची वेळ आल्यानंतर भीमा खोऱ्यात पाणी शिल्लक राहणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed