• Sun. Sep 22nd, 2024

चक्रीवादळापूर्वी घ्यावयाच्या खबरदारीबाबत किनारपट्टी जिल्ह्यात ९ नोव्हेंबर रोजी रंगीत तालिम

ByMH LIVE NEWS

Nov 8, 2023
चक्रीवादळापूर्वी घ्यावयाच्या खबरदारीबाबत किनारपट्टी जिल्ह्यात ९ नोव्हेंबर रोजी रंगीत तालिम

मुंबई, दि.८ राज्याच्या किनारवर्ती क्षेत्रात चक्रीवादळापूर्वीची सूचना देणाऱ्या आणि तत्काळ उपाययोजना संदर्भात राज्यस्तरीय आपत्तीपूर्व प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिक कार्यक्रम १ ते २४ नोव्हेंबर २०२३ रोजी चार टप्प्यात होणार आहे. स्थानिक प्रशासन आणि स्थानिक भागातील नागरिकांनी चक्रीवादळासारखी आपत्ती आल्यानंतर कशाप्रकारे प्रतिसाद द्यावा यासाठी ही रंगीत तालीम आयोजित केली आहे. ही रंगीत तालिम दि. ९ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यंत मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील तसेच नवी मुंबई येथील निवडक ठिकाणी घेण्यात येणार आहे. यामुळे तेथील ठिकाणाच्या नागरिकांनी ही रंगीत तालीम फक्त अभ्यासासाठी असून यावेळी घाबरून जाऊ नये असे आवाहन राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक आप्पासो धुळाज यांनी केले आहे.

चक्रीवादळ या नैसर्गिक आपत्ती दरम्यान प्रतिसाद देण्याबाबत स्थानिक नागरिक तसेच प्रतिसाद यंत्रणा, शासकीय विभागांना  सतर्क करण्याबाबत प्रात्यक्षिके घेण्यात येणार आहे. आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाकडून राज्यात चार टप्यामध्ये आपत्तीपूर्व आणि आपत्तीनंतर घ्यावयाची खबरदारी याबाबत प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला आहे. या रंगीत तालिमीमध्ये सैन्यदल, नौसेना, वायूदल, रेल्वे, तटरक्षक दल, मुंबई पोर्ट ट्रस्ट, मेरीटाईम बोर्ड, मत्स्य आयुक्तालय, महावितरण, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका इत्यादी अशा विविध केंद्र, राज्य व खासगी संस्था, प्राधिकरणे सामील होणार आहेत. या निरनिराळ्या भागधारकांना एकाच व्यासपीठावर आणणे, त्यांच्या क्षमतांची पडताळणी करणे व आपत्तीच्या परिस्थितीत या संस्थांमार्फत प्रभावीपणे व समन्वयाने प्रतिसाद देणे हा मुख्य उद्देश आहे.

महाराष्ट्र राज्याला ७२० किमी. इतका समुद्र किनारा लाभलेला असून यामध्ये अनेक बंदरे, बेटे, मासेमारी बंदरे तसेच रासायनिक, पेट्रोकेमिकल्स इत्यादी उद्योग कंपन्यांचा देखील समावेश आहे. चक्रीवादळाच्या आपत्तीबाबत राज्यात प्रथमच मोठ्या स्वरूपातील राज्यस्तरीय रंगीत तालिम आयोजित करण्यात आलेली आहे.

दुसऱ्या टप्पातील टेबल टॉप कार्यशाळा आज झाली असून निवृत्त लेफ्ट. जनरल सय्यद अता हसनैन, आदित्य कुमार, निवृत्त कमांडर व कर्नल कीर्ती प्रताप सिंह, सह सचिव व सल्लागार यांजकडून मार्गदर्शन करण्यात आले आहे. तिसऱ्या टप्प्यात ९ नोव्हेंबर २०२३ रोजी प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित राहून प्रात्यक्षिकांचे आयोजन स्थानिक प्रशासनामार्फत करण्यात आलेले आहे.

ही रंगीत तालिम मुंबईतील मालाड, शिवडी, दादर, ठाणे जिल्ह्यातील कल्याण, भिवंडी व अंबरनाथ, पालघर जिल्ह्यातील वसई, डहाणू व पालघर तसेच रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरूड, दिवेआगर, उरण, न्हावा शेवा, श्रीवर्धन, महाड, रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, गुहागर, रत्नागिरी, राजापूर व मंडणगड तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण, देवगड, वेंगुर्ला या ठिकाणांचा समावेश करण्यात आलेला आहे.

या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांनी ही प्रात्यक्षिक घेण्यापूर्वी स्थानिक ठिकाणी कोणत्याही प्रकारचा गैरसमज होऊ नये याबाबत योग्य ती खबरदारी घ्यावी. ही सर्व प्रात्यक्षिके केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे दिलेल्या कालावधीत घ्यावीत, अशा सूचना राज्य आपत्ती मंत्रालय नियंत्रण कक्षाकडून देण्यात आलेल्या आहेत.

0000

संध्या गरवारे/विसंअ

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed