• Wed. Nov 27th, 2024

    पहिल्या टप्प्यात ३५ लाख शेतकऱ्यांना १७०० कोटी रुपयांचा अग्रीम पीक विमा होणार वितरित – कृषी मंत्री धनंजय मुंडे

    ByMH LIVE NEWS

    Nov 8, 2023
    पहिल्या टप्प्यात ३५ लाख शेतकऱ्यांना १७०० कोटी रुपयांचा अग्रीम पीक विमा होणार वितरित – कृषी मंत्री धनंजय मुंडे

    मुंबई, दि. 8 : राज्यातील पीक विमा कंपन्यांनी पहिल्या टप्प्यात 35 लाख 8 हजार शेतकऱ्यांना 1 हजार 700 कोटी 73 लाख रुपये पीक विमा अग्रीम वितरण करण्यास मंजुरी दिली आहे. बहुतांश ठिकाणी दिवाळी पूर्वीच पीक विम्याची अग्रीम रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले.

    विमा रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर थेट वितरण करण्यास विमा कंपन्यांनी सुरुवात केली आहे. खरीप हंगामात विविध जिल्ह्यात हवामानाच्या असमतोलामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. एक रुपयात पीक विमा योजनेमध्ये राज्यातील 1 कोटी 71 लाख शेतकऱ्यांनी सहभाग घेतलेला आहे.  अंतरिम नुकसान भरपाई (MSA) अंतर्गत विविध जिल्हा प्रशासनाने संबंधित पीक विमा कंपन्यांना अधिसूचना निर्गमित करून 25 टक्के अग्रीम पीक विमा देण्याबाबत आदेश देण्यात आले होते. त्यावरून बहुतांश कंपन्यानी विभागीय व राज्यस्तरावर अपील केलेले होते. अपिलांच्या सुनावण्या होत गेल्या, त्याप्रमाणे आतापर्यंत संबंधित विमा कंपन्यांनी एकूण 1700 कोटी रुपये रक्कम देण्याचे मान्य केले आहे. तसेच जसजसे अपिलांचे निकाल येतील, त्यानुसार शेतकरी लाभार्थी संख्या व विम्याची अग्रीम रक्कम यामध्ये मोठी वाढ होणार आहे.

    अग्रीमबाबत समस्या तातडीने सोडविण्यासंदर्भात मंत्री श्री.मुंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती केली होती. यानंतर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी संबंधित पीक विमा कंपन्यांच्या सुनावण्या तातडीने पूर्ण करण्याबाबत निर्देश दिले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हेही विम्याबाबत आग्रही होते. तसेच उर्वरित जिल्ह्यातील सर्वेक्षण, अपिलावरील सुनावण्या आदी बाबी तातडीने पूर्ण करण्याबाबत विभागाला सूचना मंत्री श्री.मुंडे यांनी केल्या आहेत.

    जिल्ह्यासाठी पीकविमा मंजूर रक्कम अशी (रक्कम रुपयांत)

    नाशिक – शेतकरी लाभार्थी – 3 लाख 50 हजार (रक्कम – 155.74 कोटी)

    जळगाव – 16,921 (रक्कम – 4 कोटी 88 लाख)

    अहमदनगर – 2,31,831 (रक्कम – 160 कोटी 28 लाख)

    सोलापूर – 1,82,534 (रक्कम – 111 कोटी 41 लाख)

    सातारा – 40,406 (रक्कम – 6 कोटी 74 लाख)

    सांगली – 98,372 (रक्कम – 22 कोटी 4 लाख)

    बीड – 7,70,574 (रक्कम – 241 कोटी 21 लाख)

    बुलडाणा – 36,358 (रक्कम – 18 कोटी 39 लाख)

    धाराशिव – 4,98,720 (रक्कम – 218 कोटी 85 लाख)

    अकोला – 1,77,253 (रक्कम – 97 कोटी 29 लाख)

    कोल्हापूर – 228 (रक्कम – 13 लाख)

    जालना – 3,70,625 (रक्कम – 160 कोटी 48 लाख)

    परभणी – 4,41,970 (रक्कम – 206 कोटी 11 लाख)

    नागपूर – 63,422 (रक्कम – 52 कोटी 21 लाख)

    लातूर – 2,19,535 (रक्कम – 244 कोटी 87 लाख)

    अमरावती – 10,265 (रक्कम – 8 लाख)

    एकूण – लाभार्थी शेतकरी संख्या – 35,08,303 (मंजूर रक्कम – 1700 कोटी 73 लाख)

    ००००

    दत्तात्रय कोकरे/विसंअ

     

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed