• Sun. Sep 22nd, 2024

बीड जिल्ह्यातील ७ लाख ७० हजार शेतकऱ्यांना मिळणार अग्रीम पीक विमा!

ByMH LIVE NEWS

Nov 7, 2023
बीड जिल्ह्यातील ७ लाख ७० हजार शेतकऱ्यांना मिळणार अग्रीम पीक विमा!

मुंबई, दि. 7 : बीड जिल्ह्यातील 7 लाख 70 हजार शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी अग्रीम पीक विमा रक्कम मिळणार आहे. भारतीय पीक विमा कंपनीकडून यासाठी एकूण 241 कोटी रुपये रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट वर्ग करण्यात येईल. यासाठी राज्याचे राज्याचे कृषी मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी पाठपुरावा केला होता.

बीड जिल्ह्यात सुरुवातीच्या व मध्य खरीप हंगामात पावसाने दीर्घकाळ खंड दिल्याने शेतकऱ्यांचे व विशेष करून सोयाबीन उत्पादकांचे नुकसान झाले. त्याचे पंचनामे करून जिल्हा प्रशासनास विमा कंपनीला 25 टक्के अग्रीम पीक विमा देण्याच्या अधिसूचना काढाण्यासाठी कृषीमंत्री श्री.मुंडे यांनी सूचना दिल्या.

पीक विमा कंपनीने सरसकट विमा देण्यास हरकत घेत आधी विभागीय आयुक्त व नंतर राज्याच्या तांत्रिक सल्लागार समितीकडे अपील केले होते. ते दोन्हीही अपील संबंधित यंत्रणांनी फेटाळून लावले होते.

मंत्री श्री. मुंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली विमा कंपन्यांची राज्यव्यापी बैठकीसाठी प्रयत्न करुन त्यातही बीड जिल्ह्यात सरसकट अग्रीम विमा देण्याबाबत भूमिका घेतली होती. आज अखेरीस भारतीय पीक विमा कंपनीने आक्षेप मागे घेतले असून बीड जिल्ह्यातील 7 लाख 70 हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर थेट अग्रीम 25 टक्के पीक विमा वितरित करण्यात येणार आहे व यासाठी विमा कंपनीने 241 कोटी रुपये इतकी नुकसान भरपाई रक्कम निश्चित केली आहे.

दिवाळीपूर्वी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अग्रीम मिळाला नाही तर आपणही दिवाळी साजरी करणार नाही, अशी भूमिका धंनजय मुंडे यांनी याआधीही जाहीर केली होती, अखेर त्यांनी दिलेला शब्द पूर्ण केल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये पण आनंदाचे वातावरण आहे.

००००

दत्तात्रय कोकरे/विसंअ

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed