नेमकं काय घडलं?
कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेसाठी भूल दिल्यानंतर चार महिलांच्या शस्त्रक्रियेस ऐनवेळी नकार देत ग्रामीण भागातील रुग्णालयातून काढता पाय घेण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या डॉक्टरला चहा बिस्किट न मिळाल्याने त्याने शस्रक्रियेस नकार दिल्याचे समोर आले आहे. ग्रामीण भागात आधीच आरोग्य सुविधांची वानवा असताना डॉक्टरांच्या या असंवेदनशिलतेमुळे गावकऱ्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे.
ही घटना जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील खात येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ३ नोव्हेंबर रोजी घडली. डॉ. तेजराम भलावे असे या डॉक्टरचे नाव आहे. खात येथील केंद्रात ते कुटुंबनियोजनासाठी आठ महिलांवर शस्त्रक्रिया करणार होते. यातील चार महिलांवर त्यांनी शस्त्रक्रिया केली. पुढे अन्य चार महिलांना त्यांनी भूलसुद्धा दिली.
भारती नितेश कानतोडे (रा. पाहुनी), प्रतिमा प्रमोद बारई(रा. ढोलमारा), करिष्मा श्रीधर राजू (रा. खात) आणि सुनिता योगेश झांजोडे अशी या महिलांची नावे आहेत. परंतु, वेळेवर चहा न मिळाल्याने डॉ. भलावी प्राथमिक आरोग्य केंद्रातून बाहेर पडले ते परतलेच नाहीत. शस्त्रक्रियेसाठी आलेल्या चार महिला तशाच ताटकळत राहिल्या. या प्रकारावर संबंधित महिलांच्या नातेवाईकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत वरिष्ठांनी दुसऱ्या डॉक्टरांची व्यवस्था केली. आपल्याला मधुमेह असून आपल्याला वेळेवर चहा बिस्किटे लागतात. ती न मिळाल्याने आपल्या रक्तशर्कराचे स्तर खालावले व आपला रक्तदाबही खालावला. त्यामुळे आपल्याला तेथून काढता पाय घ्यावा लागल्याचे स्पष्टीकरण डॉ. भलावी यांनी आपल्या वरिष्ठांना दिल्याचे कळते.
चौकशीचे आदेश
या महिलांच्या नातेवाईकांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात चांगलाच गोंधळ घातला. तेथे काही काळासाठी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. संबंधित प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांनी चौकशीचे मौखिक आदेश दिलेत. त्यासाठी तीन सदस्यांची समिती स्थापित करण्यात आली असून तीन दिवसांत अहवाल सादर करण्यात यावा, असे आदेश देण्यात आलेत. गुरुवारी हा अहवाल येणे अपेक्षित आहे.
Read Latest Maharashtra News And Marathi News