• Mon. Nov 25th, 2024

    आम्हीच नंबर वन! ग्रामपंचायत निकालानंतर भाजप, शिवसेना, कॉंग्रेसचे दावे-प्रतिदावे

    आम्हीच नंबर वन! ग्रामपंचायत निकालानंतर भाजप, शिवसेना, कॉंग्रेसचे दावे-प्रतिदावे

    मुंबई : ग्रामपंचायत निवडणूक राजकीय पक्षाच्या निवडणूक चिन्हावर लढवली जात नसतानाही भाजपसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने आपल्याच पक्षाला निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्याचा दावा सोमवारी केला.

    कॉंग्रेसने एकूण ७२१ ग्रामपंचायती जिंकल्याचा आणि महाविकास आघाडीने एकूण १,३१२ ग्रामपंचायतींत विजय मिळवत राज्यात आघाडी घेतल्याचा दावा केला आहे. भाजपने आतापर्यंत सर्वाधिक जागा जिंकल्याचे सांगत अनेक ग्रामपंचायत निवडणुकीत पक्ष पुढे असल्याचे भाजपने सांगितले. अजित पवार यांच्या गटाने पुणे जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात दमदार यश मिळाल्याचा दावा केला आहे. या दाव्या-प्रतिदाव्यांमुळे राजकीय पक्षातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये मात्र कमालीचा गोंधळ उडालेला दिसतो.

    राज्यातील २,३५९ ग्रामपंचायतींच्या २,९५० जागांसाठी रविवारी निवडणूक झाली. या निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी पार पडली. मतमोजणीला सुरुवात होताच सर्वप्रथम भाजपने यशाचे दावे केले. २१० ग्रामपंचायती जिंकत भाजपच नंबर एकचा पक्ष ठरला असल्याचा दावा भाजपने केला. ७२३ पैकी तब्बल ४४१ ठिकाणी महायुतीला विजय मिळाला आहे. हाती आलेल्या ७२३ जागांच्या निकालांमध्ये भाजपला २१०, अजित पवार गटाला १२१ जागांवर, तर शिंदे गटाला ११० जागांवर विजय प्राप्त झाल्याचा भाजपने दावा केला. दुसरीकडे महाविकास आघाडीतील शरद पवार गटाला ६५ ठिकाणी, कॉंग्रेसला ५१ ठिकाणी तर उद्धव ठाकरे गटाला जेमतेम ३४ ठिकाणी यश मिळाल्याचेही भाजपचे म्हणणे आहे.

    दुसरीकडे काँग्रेसनेही यशाचा दावा करताना ५८९ ग्रामपंचायतींवर विजयी झेंडा फडकवल्याचे म्हटले आहे. १३२ ग्रामपंचायतींत काँग्रेस विचारांच्या स्थानिक आघाडीने विजय मिळवला. त्यामुळे महाविकास आघाडीने एकूण १,३१२ ग्रामपंचायतींत विजय मिळवत राज्यात आघाडी घेतल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने ग्रामपंचायत निवडणूक निकालावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या निर्णयाला जनतेनेच योग्य ठरवल्याचे म्हटले आहे.

    राज्याच्या पातळीवर भाजप आणि काँग्रेसकडून दावे-प्रतिदावे केले जात असताना अलीकडेच उभी फूट पडलेल्या राष्टवादी काँग्रेसमध्ये मात्र शरद पवार आणि अजित पवार यांच्यातच बारामतीवरून जोरदार लढाई झाल्याचे आणि त्यात अजित पवार गटाने जोरदार मुसंडी मारल्याचे दिसून आले. बारामती तालुक्यात एकूण ३२ ग्रामपंचायतींचा निकाल लागला. त्यात ३० ग्रामपंचायतीमध्ये अजित पवार गटाने विजय मिळवला. शरद पवार गटाचा एकदी उमेदवार विजयी झालेला नाही. शिंदे गट आणि ठाकरे गटाचे उमेदवारदेखील पराभूत झाले. दोन जांगावर भाजपने विजय मिळवला आहे. राष्ट्रवादीतील फुटीनंतर ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने पहिल्यांदाच शरद पवार आणि अजित पवार गट थेट आमनेसामने आले होते. त्यात शरद पवारांसाठी हा निकाल धक्कादायक मानला जात आहे. दुसरीकडे भाजप विरोधात असताना कधीही भाजपचे सरपंच बारामतीतून निवडून आले नव्हते. आता भाजपसोबत अजित पवार सत्तेत असताना भाजपने दादांच्या पॅनलविरोधात लढून दोन जागांवर सरपंच निवडून आणले.
    बीडमध्ये अजित पवार, भाजपची पकड; राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला जिल्ह्यात फटका, कोणाला किती जागा?
    नागपुरात भाजपची सरशी

    नागपूरमध्ये भाजपने १५३ जागांवर वर्चस्व प्रस्थापित केले आहे. मतदान झालेल्या ३६१ ग्रामपंचायतींपैकी भाजपने १५३, शिंदे गटाने १३, अजित पवार गटाने २, काँग्रेसने ९६, शरद पवार गटाने ४७, उद्धव ठाकरे गटाने ६, तर इतरांनी ४४ ग्रामपंचायती ताब्यात घेतल्या आहेत.

    सिंधुदुर्गमध्ये राणेंचे वर्चस्व

    केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुन्हा आपले वर्चस्व राखण्यात यश मिळवले आहे. उद्धव ठाकरे गटाला सहा ग्रामपंचायतींवर समाधान मानावे लागले. जिल्ह्यातील एकूण २४ ग्रामपंचायतींपैकी भाजपने १६, तर उद्धव ठाकरे गटाने सहा ग्रामपंचायती ताब्यात घेतल्या. शिंदे गट, अजित पवार गट, काँग्रेस, शरद पवार गटाला येथे खातेही खोलता आले नाही.

    रायगडमध्ये शिंदेंची सरशी

    रायगड जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सर्वाधिक ६४ सरपंच निवडून आले. त्याखालोखाल राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ५०, शेकापचे ३२, भाजपचे २६, शिवसेना उद्वव ठाकरे गटाचे २०, काँग्रेसचे ३, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ३, तर १२ ठिकाणी अपक्ष, तसेच आघाडीचे सरपंच निवडून आले. बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात ३२ पैकी २३ ग्रामपंचायतींवर आमदार प्रकाश सोळंके यांचे वर्चस्व दिसून आले आहे. .

    ग्रामपंचायत निवडणुकीतील विजयाचे दावे
    काँग्रेस : ५८९
    महाविकास आघाडी : १,३१२
    भाजप : ७५०
    महायुती : १,४००
    भाजपचे हजार सरपंच? ग्रामपंचायत निकालाबाबत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा
    नाशिक जिल्ह्यात महायुतीचे वर्चस्व

    नाशिक : जिल्ह्यातील ४८ पैकी अजित पवार गट, शिंदे गट आणि भाजप महायुतीने २३ ग्रामपंचायतींवर झेंडा फडकवला. यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला सर्वाधिक १२ ठिकाणी विजय मिळाला. काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गटाच्या महाविकास आघाडीला १३ ग्रामपंचायतींवर समाधान मानावे लागले आहे. मनसेने दोन ग्रामपंचायतींवर झेंडा फडकावला आहे.

    धुळे-नंदुरबार जिल्ह्यात भाजप वरचढ

    धुळे जिल्ह्यात ३१ पैकी २५ ग्रामपंचायतींवर विजय प्राप्त केला. नंदुरबार जिल्ह्यातील १६ पैकी ९ ठिकाणी भाजपचा झेंडा फडकला आहे. सात ठिकाणी अपक्ष निवडून आले आहेत. या निकालामुळे धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात महाविकास आघाडीचा सफाया झाल्याचे पाहायला मिळाले.

    जळगाव जिल्ह्यात महायुती

    जळगाव : जिल्ह्यात १६७ पैकी सर्वाधिक ५८ ग्रामपंचायतींवर भाजप, तर शिंदे गटाने ४८ जागा जिंकल्या. तिसऱ्या क्रमांकावर अजित पवार गटाने १८ ग्रामपंचायतींवर विजय मिळवला. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटास १७, ठाकरे गटाला ११ जागांवर समाधान मानावे लागले, तर काँग्रेसला अवघ्या ४ ठिकामी सत्ता मिळवता आली.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed