• Mon. Nov 25th, 2024

    घाटकोपर ईस्टवरुन थेट LBS रोडला जाता येणार, गर्डर लागला, उड्डाणपुलाचे ९० टक्के काम पूर्ण

    घाटकोपर ईस्टवरुन थेट LBS रोडला जाता येणार, गर्डर लागला, उड्डाणपुलाचे ९० टक्के काम पूर्ण

    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: मुंबई महापालिकेच्या एन विभाग हद्दीत पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा विद्याविहार रेल्वे स्थानकावरून जाणारा उड्डाणपूल मुंबई महापालिकेच्या वतीने बांधण्यात येत आहे. या उड्डाणपुलासाठी १ हजार १०० मेट्रिक टन वजनाचा सुमारे १०० मीटर लांबीचा दुसरा गर्डर यशस्वीपणे स्थापित करण्याचा महत्त्वाचा टप्पा शनिवारी मध्यरात्री पार पडला. त्यामुळे रेल्वे हद्दीतील पुलाचा विचार करता त्याचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे.

    घाटकोपर परिसरात पूर्वेकडील रामकृष्ण चेंबूरकर आणि पश्चिमेकडील लालबहादूर शास्त्री मार्ग यांना जोडण्यासाठी विद्याविहार रेल्वे स्थानक रुळांवरून जाणारा उड्डाणपूल मुंबई महापालिकेच्या पूल विभागाच्या वतीने बांधण्यात येत आहे. पूल बांधताना दोन्ही बाजूच्या वाहतुकीसाठी प्रत्येकी एक असे दोन स्टील गर्डर स्थापित करावे लागणार होते. त्यापैकी पहिला गर्डर २७ मे रोजी यशस्वीपणे स्थापित करण्यात आला होता. तर दुसऱ्या गर्डरचे काम शनिवारी मध्यरात्री सुरू झाले. हे काम पहाटे ५.३० वाजता पूर्ण करण्यात आले. दुसरा गर्डर बसवण्यासाठीच्या कामासाठी मध्य रेल्वेने मेगाब्लॉक जाहीर केला होता. त्या वेळेत गर्डर स्थापन करण्याचे काम विंच पुलिंग पद्धतीने पूर्ण करण्यात आले. हा गर्डर उभारणीसाठी रेल्वेमार्गावर एकूण ९९.३४० मीटर पुढे नेणे आवश्यक होते. त्यापैकी रेल्वे रुळ ओलांडून सुमारे ७८ मीटर लांब पुढपर्यंत गर्डर नेण्याचा महत्त्वाचा टप्पा पार पडला. तर, उर्वरित २२ मीटर पुढे नेण्याचे काम येत्या दोन दिवसांत पूर्ण केले जाणार असल्याचे मुंबई पालिकेकडून सांगण्यात आले. पहिला गर्डर स्थापित करून अवघ्या काही महिन्यातच दुसऱ्या गर्डर स्थापनेचे काम पूर्ण करणे शक्य झाले. येत्या काही दिवसांत या पुलाच्या दोन्ही बाजूच्या पोहोच मार्गांची कामे पूर्ण होतील.

    गर्डरचे वजन १,१०० मेट्रिक टन

    भारतात रेल्वेवरील आत्तापर्यंतचे सर्वाधिक लांबीचे हे दोन गर्डर हे प्रत्येकी ९९.३४ मीटर लांब व ९.५० मीटर रुंदीचे आहेत. त्यांचे वजन प्रत्येकी सुमारे अकराशे मेट्रिक टन आहे. या दोन खुल्या स्टील गर्डरची रेल्वे मार्गावर टप्प्याटप्प्याने उभारणी करण्याची प्रक्रिया मुंबई पालिकेच्या पूल विभागाकडून पार पाडण्यात आली आहे. विशेष म्हणजे या गर्डरला रेल्वे रुळांच्या मधोमध आधार न ठेवता, विनाखांब एकसंधपणे त्याची उभारणी केली जात आहे.

    डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्ण करणार

    दोन्ही गर्डर स्थापनेनंतर आता पुढील टप्प्यामध्ये पुलाच्या पूर्व व पश्चिम अशा दोन्ही बाजूंकडील १७.५० मीटर रुंदीच्या पोहोच रस्त्यांचे बांधकाम करण्यात येईल. येत्या पंधरवड्यात त्याचेदेखील कार्यादेश दिले जातील. एकूणच, प्रकल्पाचे संपूर्ण काम डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे महानगरपालिका प्रशासनाचे नियोजन आहे.

    म. टा. प्रतिनिधी यांच्याविषयी

    Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed