• Mon. Nov 25th, 2024
    Pune News: पुणेकरांनो काळजी घ्या: संसर्गजन्य आजारात वाढ, हिवाळ्यात ‘फ्लू’ वाढण्याची कारणे?

    पुणे : शहरात गेल्या काही दिवसांमध्ये थंडी वाढल्याने संसर्गजन्य आजारांनी डोकेवर काढले आहे. सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी, अंगावर पुरळ येणे, हातांच्या बोटांवर सूज येणे या प्रकारची लक्षणे सध्या रुग्णांमध्ये आढळून येत आहेत. याबरोबरच ‘इन्फ्लुएन्झा’ विषाणूचे प्रकार असलेल्या ‘एच-१ एन-१’ आणि ‘एच-३ एन-२’ या आजारांचेही रुग्ण आढळून येत आहे. सध्याचे वातावरण विषाणूचा प्रादूर्भाव होण्यासाठी पोषक असल्याने संसर्गजन्य आजारांचे रुग्ण वाढल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

    ‘गंभीर रुग्ण कमी’

    शहरात ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत उष्ण वातावरण होते, तर गेल्या काही दिवसांपासून थंडी वाढली आहे; तसेच हिवाळ्याच्या दिवसांमध्ये प्रदूषणाचे प्रमाण वाढते. त्यामुळे दर वर्षी या दिवसांमध्ये आजारांचे प्रमाण वाढते. ‘रुबी हॉल क्लिनिक’च्या अतिदक्षता विभागाच्या प्रमुख डॉ. प्राची साठे म्हणाल्या, ‘सध्या डेंगी आणि इन्फ्लुएन्झाचे रुग्ण आढळून येत आहेत. मात्र, गंभीर रुग्णांचे प्रमाण कमी आहे. शहराबरोबरच राज्यातही फ्लूच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.’

    अफगाणिस्तानचा पाकिस्तानला मोठा धक्का, विजयासह गुणतालिकेत झाला मोठा उलटफेर
    अशी आहे रुग्णसंख्या

    आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात एक जानेवारी ते ३१ मे या कालावधीत स्वाइन फ्लू (एच१एन१) च्या ५३७ रुग्णांची नोंद झाली, तर सहा रुग्णांचा मृत्यू झाला. एक जून ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत ५८८ रुग्ण आढळून आले, तर १९ रुग्णांचा मृत्यू झाला. एक जानेवारी ते ३१ मे या कालावधीत एच-३ एन-२ या विषाणूच्या ५१८ रुग्ण आढळून आले असून, यातील सात रुग्णांचा मृत्यू झाला. एक जून ते ३१ ऑक्टोबर या कावावधीत १,४९१ रुग्ण आढळले असून एका रुग्णाचा मृत्यू झाला.

    हिवाळ्यात ‘फ्लू’ वाढण्याची कारणे

    – विषाणूसाठी पोषक वातावरण.
    – उन्हाळ्याच्या तुलनेत सूर्यप्रकाश कमी असतो.
    – सूर्यप्रकाश कमी असल्याने विषाणू जास्त काळ टिकतात.
    – प्रदूषण जास्त असल्याने संसर्ग वाढतो.
    -‘व्हिटॅमिन डी’च्या कमतरतेमुळे रोगप्रतिकारकशक्ती कमी होते.
    – सणासुदीचे दिवस असल्याने बाजारापेठांमध्ये गर्दी वाढते.
    – अॅलर्जीमुळे सर्दी, खोकला, तापाचे प्रमाण वाढते.

    सध्या संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढले आहे. हातांच्या बोटांना सूज येणे, शरीरावर पुरळ येणे, सांधेदुखी, पाय दुखणे, डोकदुखी या प्रकारची लक्षणे बहुतांश रुग्णांमध्ये आढळून येत आहे. रुग्णांमध्ये डेंगीची लक्षणे आढळून येत असली तरी प्रत्यक्षात निदान होण्याचे प्रमाण की आहे. हिवाळ्यामध्ये प्रदूषणाचे प्रमाण जास्त असल्याने आजारांचे प्रमाण वाढते. काही रुग्णांना खोकल्याचा त्रास पंधरा दिवसांपर्यंत होत आहे.

    – डॉ. दिलीप देवधर, ज्येष्ठ फॅमिली फिजिशियन

    सध्या संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढले आहे. अशक्तपणा येणे, कोरडा खोकला, ताप, सर्दी या प्रकारची लक्षणे रुग्णांमध्ये आढळून येत आहे. काही रुग्णांमध्ये करोनाची लक्षणे दिसून येत आहे. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये संसर्गजन्य आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ होत असतो.

    – डॉ. अनिकेत जोशी, फिजिशियन

    विजयासह अफगाणिस्तान सेमी फायनलमध्ये पोहोचणार का, जाणून घ्या संपूर्ण समीकरण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed