• Sun. Sep 22nd, 2024
Breaking News : भाजप आमदार गोवर्धन शर्मा यांचे कर्करोगाने निधन

अकोला : अकोला जिल्ह्यातील अकोला पश्चिम मतदार संघाचे भाजपचे आमदार गोवर्धन शर्मा यांचं निधन झालंय. गेल्या अनेक दिवसांपासून राहत्या घरी त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान आज रात्री ८ वाजताच्या सुमारास शर्मा यांचा मृत्यू झालाय. उद्या ३ नोव्हेंबर रोजी अकोला शहरातील अन्नपूर्णा माता मंदिराजवळ त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.

नागरिकांच्या अनेक समस्या निराकरणासाठी कटिबद्ध असणारे आमदार शर्मा लोकांसाठी सदैव २४ तास उपलब्ध असत. कधीही जवळ मोबाईल न ठेवता लोकांची थेट आठवण ठेवणारे, अशी त्यांची ओळख होती. विठ्ठल मंदिराच्या माध्यमातून धार्मिक क्षेत्रामध्ये काम करणारे तसेच अयोध्या येथील शीला पूजन १९९५ पासून ‘श्रीराम जन्मभूमी’ आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग राहिलेला आहे. लोकनेते आणि राम भक्त म्हणून ते प्रसिद्ध आहेत.

अकोला नगरपालिकेचे पाणीपुरवठा सभापती नियोजन समिती सदस्य तसेच नियोजन सभापती म्हणून त्यांनी काम केलं. अकोला शहरातील पाणीटंचाई संदर्भात त्यांनी महत्त्वपूर्ण काम केलं. तसेच नगरसेवक कसा असावा याचा आदर्श त्यांनी उभा केला. जुन्या शहरात शैक्षणिक संस्था उभ्या करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षणापासून वंचित राहण्यापासून त्यांनी वाचवलं. तसेच उच्च शिक्षणापर्यंतची सोय देखील त्यांनी उपलब्ध करून दिली. सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम त्यांनी केलं.

अकोलेकरांच्या सुखदुःखात सहभागी होणारे व सदैव मदतीचा हात देणारे गोवर्धन शर्मा सामाजिक क्षेत्रामध्ये सातत्याने कार्यरत असत. गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख होती. संकटकाळी धावून जाणे, पूर असो वा दंगल तिथे ते जायचेच.

आमदार शर्मा यांच्या निधनाची बातमी मिळताच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून एक चांगला ज्येष्ठ सहकारी व स्वाभिमानी सर्वांना सोबत घेऊन पक्षाविषयी एकनिष्ठ असणारा लोकनेता गेल्याचा दुःख व फार मोठी हानी झाली, या शब्दात त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या निधनाने संघ परिवार व राम भक्तांमध्ये दुःखाचा डोंगर कोसळला आहे ‌.

मागील निवडणुकीत शेवटच्या क्षणापर्यंत कडवी झुंज देणाऱ्या साजीद खान यांना ६७ हजार ६२९ हजार मते मिळाली, तर भाजप उमेदवार शर्मा यांचा अवघ्या २६६२ मतांनी पराभव झाला होता. गेल्या २५ वर्षांपासून अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघावर दणदणीत विजयश्री प्राप्त करणारे शर्मा यांनी या निवडणुकीत म्हणजे सहाव्यांदा विजय मिळवला होता.

भाजपचे गोवर्धन शर्मा यांच्या नावावर ‘डबल हॅट्ट्रिक’ मारल्याची नोंद अकोल्याच्या इतिहासात झाली होती. भाजपचे वर्चस्व असलेल्या अकोला पश्चिम मतदारसंघातील मतदारांनी वेळोवेळी हिंदुत्वाच्या अजेंड्यानुसार भाजपच्या पारड्यात मतांचे दान टाकल्याचे चित्र पाहावयास गेले आहे. आज अकोला पश्चिम भाजपसाठी हा मतदारसंघ कायम अनुकूल मानला जातोय. गोवर्धन शर्मा या मतदारसंघाचे विद्यमान आमदार असून, २०१४ मधील विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेसोबत युती नसली तरी त्यांना मिळालेले मताधिक्य पाहता या मतदारसंघात भाजपची तटबंदी फार मजबूत असल्याचे लक्षात आली होती. २०१४ मधील विधानसभेच्या निवडणुकीत आमदार शर्मा यांना ६६ हजार ९३४ मते मिळाली होती. तर २०१९ मध्ये शर्मा यांना ७० हजार २९१ मते मिळाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed