• Mon. Nov 25th, 2024

    ललित पाटील प्रकरण: त्यांच्या मदतीमुळेच ड्रग्ज तस्करी शक्य, पोलिसांना त्या अदृश्य हातांचा शोध

    ललित पाटील प्रकरण: त्यांच्या मदतीमुळेच ड्रग्ज तस्करी शक्य, पोलिसांना त्या अदृश्य हातांचा शोध

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : ससून रुग्णालयात ललित पाटीलला मुक्त वातावरण निर्माण करून देणाऱ्या आणि त्याला रुग्णालयाबाहेर राजरोसपणे सोडणाऱ्या पोलिस आणि ससून रुग्णालय प्रशासनातील अधिकारी-कर्मचाऱ्यांमुळेच ससून रुग्णालयातून अमली पदार्थ तस्करीचे रॅकेट चालविणे शक्य झाल्याचे दिसून येते. ललित पाटीलला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत करणारे ‘ते’ हात नसते, तर हे रॅकेट चालविणे शक्य झाले नसते. मात्र, अद्याप पुणे पोलिसांकडून त्या अदृश्य हातांचा शोध घेण्यात आलेला नाही.

    ललित पाटील न्यायबंदी म्हणून ससून रुग्णालयात दाखल झाला होता. तेथून त्याने भूषण पाटील, अभिषेक बलकवडे, राहुल पंडित ऊर्फ रोहितकुमार चौधरी, अमितकुमार, शिवाजी शिंदे, जिशान शेख, रेहान ऊर्फ गोलु आलम सुलतान अहमद अन्सारी यांच्या मदतीने नाशिक येथील ‘शिंदेगाव एमआयडीसी’त कारखान्यात मेफेड्रोन हा अमली पदार्थ तयार करून विक्री करीत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या गुन्ह्यात पाहिजे असलेल्या सर्व आरोपींना आता पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे पोलिस आता तरी या गुन्ह्यात अप्रत्यक्ष मदत करणाऱ्यांना ‘रेकॉर्ड’वर घेणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

    अदृश्य हातांचा सहभाग कसा?

    ससून रुग्णालयात उपचार घेणाऱ्या कैद्यांच्या वॉर्डबाहेर पोलिसांची सुरक्षा व्यवस्था असते. ससून रुग्णालय प्रशासनाचे कर्मचारीही वॉर्डमध्ये कार्यरत असतात. त्यांच्याखेरीज अन्य कोणा व्यक्तीला त्या वॉर्डमध्ये प्रवेश दिला जात नाही. असे असताना वॉर्डमध्ये ललित पाटीलकडे दोन मोबाइल फोन कोणी आणून दिले किंवा मोबाइल घेऊन आलेल्या व्यक्तीला वॉर्डमध्ये सोडताना कर्तव्यावर हजर असलेल्या पोलिसांचीही त्यांना साथ होती का, असे प्रश्न उपस्थित होतात.

    न्यायालयानेही केली होती विचारणा

    ललित पाटीलला पळून जाण्यासाठी विनय अऱ्हानाने मदत केली होती. अऱ्हानाच्या चालकाने पाटीलला शहराबाहेर सोडले होते. मॅनेजरने एटीएम कार्ड दिले होते. ही बाब पोलिसांनी न्यायालयासमोर मांडली होती. त्या वेळी मॅनेजरवर अद्याप गुन्हा का दाखल केला नाही, अशी विचारणा न्यायालयाने केली होती.
    अखेर ललित पाटील पुणे पोलिसांच्या ताब्यात; बुधवारी न्यायालयात करणार हजर
    त्यांना आरोपी करणार का?

    ससून रुग्णालयातील वॉर्डमध्ये कैद्यांसाठी असलेल्या मुक्त वातावरणामुळेच ससून रुग्णालयातून अमली पदार्थ तस्करीचे रॅकेट चालवणे शक्य झाले. या मुक्त वातावरणाचा रॅकेटला थेट फायदा झाल्याचे दिसून येते. त्यामुळे त्यास कारणीभूत असलेल्या व्यक्तींना या गुन्ह्यात आरोपी करणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पोलिसांनी संबंधितांवर केवळ निलंबनाची कारवाई केली आहे. एवढ्यावरच पोलिस थांबणार का, असा प्रश्नही आहे.

    वारंवार ‘ससून’मधून बाहेर

    – ललित पाटीलचा अन्य आरोपींशी ‘ससून’मधून संपर्क.
    – ललित पाटील ससून रुग्णालयातून वारंवार बाहेर जात असल्याचे स्पष्ट.
    – ससून रुग्णालयातून पळून जाण्यासाठी विनय अऱ्हानाची मदत.
    – विनय अऱ्हानानेही ‘ससून’च्या वॉर्डमधून त्याचा मॅनेजर आणि चालकाशी संपर्क साधला होता.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *