गुमगाव येथील बहुचर्चित तिहेरी हत्याकांडाच्या आरोपात राजू शन्नू बिरहा (४५) याला सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. ती कायम ठेवण्यात यावी, यासाठी राज्य सरकारने उच्च न्यायालयात अर्ज केला आहे. त्यावरील दोन्ही पक्षांचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे. न्यायालयाने आता या प्रकरणावरील निकाल राखून ठेवला आहे. ही घटना १७ नोव्हेंबर २०१७ रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास हिंगणा तालुक्यातील नवीन गुमगाव (वागदरा) येथील वृंदावन सिटी परिसरात घडली. राजू हा सदरमधील कुख्यात गुन्हेगार आहे. राजू बिरहा आणि सुनील कोटांगळे दोघांची वृंदावन सिटीसमोर पानठेला आणि चहाची टपरी होती. हे दोघे अवैध दारूविक्रीच्या व्यवसायात होते.
त्यावरून दोघांमध्ये जुना वाद होता. घटनेच्यावेळी सुनीलचे मित्र कैलास आणि गोलूही तेथे आले होते. तिघांना बघून राजूने पानठेल्यातून सत्तूर काढला. तो सुनीलच्या दिशेने धावला. त्याने सुनीलवर हल्ला करताच सुनील जमिनीवर कोसळला. कैलास आणि गोलू जीव मुठीत घेऊन तेथून पळायला लागले. त्यांनाही ठार मारण्यासाठी राजू धावायला लागला. याचवेळी कमलेश पंचमलाल झारिया मोटारसायकल घेऊन आला. राजू त्याच्या मोटारसायकलवर बसला आणि कैलासवर सत्तूरने वार केला. कैलास खाली पडल्यावर त्याच्यावर सपासप वार केले. पुढे गोलूचाही पाठलाग करून एका शेतात त्याचीही हत्या केली.
हिंगणा पोलिसांनी राजूवर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. तपासाअंती आरोपपत्र सादर केले. पोलिसांनी कमलेश झारियावरही गुन्हा दाखल करून त्याच्याविरुद्ध आरोपपपत्र सादर केले होते. सत्र न्यायालयाने डिसेंबर २०२२ मध्ये राजुला फाशीची शिक्षा सुनावली. याप्रकरणी न्यायालयाने कारागृह प्रशासनाकडून त्याच्या वर्तवणुकीचा अहवाल मागविला होता. गेल्या सुनावणी दरम्यान तो न्यायालयापुढे सादर करण्यात आला. या अहवालानुसार, राजूचे वर्तन सामान्य आहे. मंगळवारी राजुच्या फाशीवर निकाल येणे अपेक्षित आहे.