• Sun. Sep 22nd, 2024
सातारा पोलिसांना माहिती कळाली, पथक तयार करून धाड टाकली, आल्याच्या शेतात दुसराच ‘उद्योग’

सातारा : आल्याच्या शेतात गांजाच्या झाडांची विक्री करण्याच्या उद्देशाने लागवड करून जोपासणा करणाऱ्या एका व्यक्तीस पोलिसांनी अटक केलीये. त्याच्या शेतातून सुमारे साडेसत्तावीस लाखांच्या गांजाची झाडे जप्त केली. याप्रकरणी संबधितांविरोधात बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, खोजेवाडी येथील व्यक्ती लहू कुंडलिक घोरपडे याने त्याच्या मानकर शिवार नावाच्या शिवारातील आले पिकाच्या शेतात गांजाची लागवड करून विक्री करण्यासाठी तो जोपासत आहे. ही बातमी कळाल्यानंतर पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे व पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील यांना संबंधित ठिकाणी जाऊन आक्षेपार्ह आढळल्यास कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार मौजे खोजेवाडी (ता.जि. सातारा) गावाच्या हद्दीतील आले पिकाच्या शेतात जावून पोलीस पथकाने पाहणी केली असता शेतात गांजाची झाडांची लागवड केल्याचे आढळून आले.

त्यावेळी शेतात उभ्या असलेल्या व्यक्तीस कोणाचे शेत आहे? याबाबत विचारणा केली असता त्याने शेत हे स्वतःच्या मालकीचे असल्याचे सांगितले. तसेच या शेतात गांजाच्या झाडांची लागवड करून जोपासत असल्याचेही कबूल केले.

आल्याच्या शेतात लागवड व जोपासना केलेली एकूण १८ गांजाची झाडे पथकाने ताब्यात घेतली. त्याचे वजन केले असता ते १०९.३८० किलोग्रॅम इतके होते. जप्त करण्यात आलेल्या गांजाच्या झाडांची किंमत २७ लाख ३४ हजार ५०० रुपये इतकी आहे. याप्रकरणी संबंधिताविरोधात बोरगाव पोलीस ठाण्यात गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ चे कलमान्वये गुन्हा नोंद केला आहे.

सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांनी अंमली पदार्थाची विक्री, वाहतूक, लागवड करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध कारवाई करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना दिले होते. देवकर यांनी सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे व पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदारांचे पथक तयार करून अंमली पदार्थाची विक्री, वाहतूक, लागवड करणाऱ्या व्यक्तीची माहिती मिळवून त्याच्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, रविंद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील, विश्वास शिंगाडे, अमित पाटील, पोलीस अंमलदार अतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, लक्ष्मण जगधने, शिवाजी गुरव, हसन तडवी, शिवाजी भिसे, राजू कांबळे, गणेश कापरे, अमित माने, ओंमकार यादव, धीरज महाडीक, प्रवीण पवार, वैभव सावंत, संकेत निकम, संभाजी साळुंखे व फॉरेन्सीक विभागाचे अंमलदार यांनी ही कारवाई केली. त्यांचे पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed