मुळातच परंपरा, संस्कृतीची जपणूक करण्याची धारणा असलेल्या पत्की कुटुंबात नवा पाहुणा येण्याची चाहूल लागताच साहजिकच सोहळ्यांची तयारी सुरू झाली. स्मृती मिलिंद पत्की यांनी आपली सून डॉ. सई प्रणव कुलकर्णीच्या डोहाळेजेवणाचा घाट घालण्याचे ठरवले. त्यासाठी दसऱ्यासारखा सुवर्णमुहूर्त साधण्याचे त्यांनी ठरवले. डॉ. सईही आपल्या आयुष्यातील आनंददायी क्षण अनुभवण्यासाठी तयार होत्या. मात्र, परंपरेनुसार सारे करताना आपण थोडासा वेगळा विचार करायला हवा, असे त्यांना वाटले. त्यामुळेच एरवी अशा सोहळ्यात ‘सवाष्णींना’ देण्यात येणाऱ्या सन्मानाच्या परंपरेत बदल व्हावा, असे त्यांना वाटले. त्यामुळेच डोहाळजेवणातील ओटी, औक्षणासारखे पारंपरिक कार्यक्रम हे घरातील जवळच्याच पण विधवा महिलांच्या हस्ते व्हावेत, अशी इच्छा त्यांनी बोलून दाखवली.
हळदीकुंकवापासून ते सणसमारंभापर्यंत सारे परंपरेनुसार करणाऱ्या त्यांच्या सासूबाई, स्मृती मिलिंद पत्की यांना सुरुवातीला हा विचार मान्य करणे कठीण गेले. ‘माझ्या सासूबाईंनी या विचाराला सुरुवातीला कठोर विरोध केला. मात्र, माझा पती, हृषिकेशने मला बळ देत हा विचार अधिक योग्यरीतीने मांडण्याचे सुचवले. दोन दिवस आम्ही यावर बोललोच नाही. मात्र, तिसऱ्या दिवशी सासूबाई स्वत: यासाठी तयार झाल्या. त्यांना माझा विचार पटला. विधवांना आपण कार्यक्रमांना बोलावणे, हे अशुभ न मानण्यापर्यंत बदलांचा प्रवास झाला असला तरी त्यांना सन्मान देणे आणि आनंद सोहळ्यात सक्रीय सहभागी करून घेणे सर्वसाधारणपणे मान्य केले जात नाही. शिवाय या महिलांच्या मनातही आपण कार्यक्रमात सहभागी झालो आणि काही बिनसले तर… अशी धास्ती असते. त्यामुळेच हा बदल घडविणे मला महत्त्वाचे वाटते’, असे डॉ. सई सांगतात. आपण बोलावताना, मान देताना जसे कचरतो, तसेच त्याही सहभागी होताना गोंधळत असल्याचा अनुभव आला. म्हणूनच त्यांनी सहभाग घ्यावा, यासाठी आग्रह धरला आहे, असेही डॉ. सई सांगतात.
विचारपरिवर्तन महत्त्वाचे
‘माझा विचार आई, राधिका कुलकर्णी आणि वडिलांनी लगेचच मान्य केला. तर सासूबाईंनी विचाराअंती त्याला मान्यता देत एक पाऊल पुढे टाकले. त्यांच्या पिढीने नवे विचार स्वीकारणे, हे मला महत्त्वाचे वाटते. आमंत्रण दिलेल्या महिलाही याच पिढीचे प्रतिनिधित्व करत असल्याने त्यांना हा विचार मान्य करण्यास वेळ लागला. आपल्या सहभागाने अशुभतेचे सावट येऊ नये, ही भावना आम्ही दूर करू शकलो, याचे समाधान आहे’, असे सई आवर्जून नमूद करतात.