• Mon. Nov 25th, 2024

    नागपूरकरांसाठी मोठी बातमी! दीक्षाभूमीजवळील आठ रस्ते आजपासून ३ दिवसांसाठी बंद, पर्यायी मार्ग कोणते?

    नागपूरकरांसाठी मोठी बातमी! दीक्षाभूमीजवळील आठ रस्ते आजपासून ३ दिवसांसाठी बंद, पर्यायी मार्ग कोणते?

    म. टा. प्रतिनिधी, नागपूर : धम्मचक्र प्रवर्तनदिनाच्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी मोठ्या प्रमाणावर बौद्ध अनुयायी रेल्वे, बसमधून तसेच खासगी वाहनाने दीक्षाभूमीला येतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊ नये तसेच नागरिकांची सोय व्हावी, याउद्देशाने दीक्षाभूमीजवळील आठ रस्ते २२ ऑक्टोबरच्या दुपारी ३ वाजतापासून ते २५ ऑक्टोबरच्या दुपारी २ वाजतापर्यंत बंद राहणार आहेत. यामुळे दीक्षाभूमी परिसरात वाहतूक कोंडी होणार नाही, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

    बंद केलेले मार्ग

    – काचीपुरा चौक (कृषी महाविद्यालय वसतिगृह) ते माताकचेरी चौकापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजू.
    – काचीपुरा चौक ते कल्पना बिल्डिंग (रामदासपेठ) टी-पॉइंटपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजू.
    – माताकचेरी ते कृपलानी टर्निंग (वर्धा रस्ता) रस्त्याच्या दोन्ही बाजू.
    – माताकचेरी ते नीरी रोड टी-पॉइंट रस्त्याच्या दोन्ही बाजू.
    – माताकचेरी ते लक्ष्मीनगर चौकापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजू.
    – काचीपुरा चौक ते बजाजनगर चौक या दोन्ही बाजू. हा मार्ग एसटी बस आणि आपली बसेसच्या पार्किंगसाठी वापरला जाईल.
    – बजाजनगर चौक ते लक्ष्मीनगर चौक
    – अजनी रेल्वेपूल ते कृपलानी चौक (दीक्षाभूमीला येणाऱ्या अनुयायांच्या वाहनांचे पार्किंग)
    – खाद्यपदार्थांचे पार्सल/जेवण वितरित करणाऱ्या वाहनांनादेखील या मार्गांवर प्रवेशास मनाई असेल.

    वळविण्यात आलेली वाहतूक व्यवस्था

    -जनता चौकाकडून काचीपुरा चौकाकडे जाणारी वाहतूक जनता चौक-पंचशील चौक (उजवीकडे वळण) -मेहाडिया चौक-मुंजे चौक (डावीकडे वळण)- राणी झाशी चौक-विद्यापीठ ग्रंथालय चौक-अलंकार टॉकीज चौकमार्गे वळवण्यात येईल.
    – वर्ध्याकडून माताकचेरी चौकाकडे जाणारी वाहतूक कृपलानी मार्गे वळवण्यात येईल आणि अजनी चौकातून डावीकडे आरपीटीएस रस्त्याकडे वळेल. तसेच जनता चौकाकडून कृपलानी चौक मार्गाने माता कचेरी चौकाकडे जाणारी वाहतूक अजनी पूल चौकातून उजवीकडे वळण घेऊन वर्धा रोडवरून आरपीटीएसकडे जाईल.
    – अलंकार टॉकीज चौकातून येणारी व काचीपुरा चौकाकडे जाणारी वाहतूक उत्तर अंबाझरी मार्गाने शंकरनगर चौकातून मुंजे चौकमार्गे विद्यापीठ ग्रंथालय चौक आणि राणी झाशी चौकाकडे वळवण्यात येईल.
    – लक्ष्मीनगर चौक ते माताकचेरी चौकाकडे जाणारी वाहतूक बजाजनगर चौकातून आठ रस्ता चौकाकडे वळवली जाईल.
    – नीरी टी-पॉइंट ते माताकचेरी चौकापर्यंतची वाहतूक आरपीटीएस आणि अजनी चौकातून मार्गस्थ केली जाईल.
    – बजाजनगर चौकाकडून लक्ष्मीनगर चौकाकडे जाणारी वाहतूक व्हीएनआयटी चौकातून वळवून अभ्यंकरनगरमार्गे जाईल.
    – अजनी रेल्वेपुलावरून येणारी वाहतूक अजनी रेल्वेस्टेशन रोडने उजवीकडे किंवा डावीकडे चुनाभट्टी रोडने पुढे जाईल.

    अनुयायांसाठी पार्किंगस्थळे

    धरमपेठ सायन्स कॉलेज, धरमपेठ कला व वाणिज्य महाविद्यालय, धरमपेठ शाळा, राणी लक्ष्मीबाई सभागृह (लक्ष्मीनगर), बजाजनगर बास्केट बॉल मैदान, मॉडर्न हायस्कूल (नीरी), पटवर्धन मैदान, नवीन डीपी रोड, कृपलानी चौक ते अजनी रेल्वेपूल.

    ७०४ स्वच्छता कर्मचारी

    महापालिकेने स्वच्छता सुविधा सुनिश्चित करण्यासाठी ७०४ कर्मचारी तैनात केले आहेत. माताकचेरी, आयटीआय आणि जेल परिसर येथे ९०० शौचालये राहतील. नीरी रोड, काचीपुरा, लक्ष्मीनगर चौक, रहाटे कॉलनी चौक, यशवंत स्टेडियम, अंबाझरी तलाव आणि चुनाभट्टी रोड येथे सात फिरती शौचालये उभारण्यात येतील. विविध मार्गांवर २०० कचराकुंड्या, कचरा संकलित करणारी २० वाहने, शौचालये स्वच्छ करण्यासाठी चार सक्शन मशिन असतील. त्याशिवाय कंट्रोल रूममध्ये वॉटरवर्क, इलेक्ट्रिकल, सार्वजनिक बांधकाम विभाग, सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी, अग्निशामक आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी असतील.
    नाशिककरांसाठी महत्वाची बातमी! मंगळवारी शहरातील वाहतुकीत मोठे बदल, पर्यायी मार्ग कोणते?
    दीक्षाभूमी ते ड्रॅगन पॅलेस पर्यंत ‘आपली बस’सेवा

    महापालिकेच्या परिवहन विभागातर्फे २२ ते २६ ऑक्टोबर या कालावधीत दीक्षाभूमी ते ड्रॅगन पॅलेसदरम्यान १५९ विशेष आपली बससेवा चालवली जाईल. या विशेष बसेस दीक्षाभूमीपासून सुरू होऊन अंबाझरी, नारा, नारी, वैशालीनगर, नागसेन, राणी दुर्गावती चौक, आंबेडकर चौक (गरोबानगर), रामेश्वरी आदी मार्गांनी कामठी येथील ड्रॅगन पॅलेसला पोहोचतील. २२ ऑक्टोबरला ३, २३ला २९, २४ला ८६, २५ला ३९ तर २६ ऑक्टोबरला २ फेऱ्या सुटतील.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *