• Sun. Sep 22nd, 2024

सिल्लोड-सोयगाव मतदारसंघातील पाणी पुरवठा योजनांना गती द्यावी – मंत्री गुलाबराव पाटील

ByMH LIVE NEWS

Oct 17, 2023
सिल्लोड-सोयगाव मतदारसंघातील पाणी पुरवठा योजनांना गती द्यावी – मंत्री गुलाबराव पाटील

मुंबई, दि. १७ : जल जीवन मिशनअंतर्गत सिल्लोड, सोयगाव मतदारसंघातील योजनांचा आढावा घेऊन प्रलंबित कामांना गती देऊन ही कामे तातडीने पूर्ण करावीत, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. तसेच अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांच्या उपस्थित वॉटर ग्रीडबाबत स्वतंत्र बैठक घ्यावी, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.

सिल्लोड, सोयगाव मतदारसंघातील पाणीपुरवठा योजनेची आढावा बैठक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व अल्पसंख्यांक विकास मंत्री श्री. सत्तार यांच्या उपस्थितीत मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, जलजीवन मिशनचे संचालक अमित सैनी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे सहसंचालक अभिषेक कृष्णा, पाणीपुरवठा विभागाच्या मुख्य अभियंता मनीषा पलांडे, संभाजीनगरचे मुख्य अभियंता आर. एस. लोलापोडे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता दीपक कोळी, अधीक्षक अभियंता बी. के. वानखेडे, पाणीपुरवठा विभागाचे वासुदेव पाटील, छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता अजित वाघमारे, वरिष्ठ भूवैज्ञानिक छत्रपती संभाजीनगरचे जीवन बडेवाल आदी उपस्थित होते.

सिल्लोड सोयगाव मतदारसंघातील जलजीवन अंतर्गत कामाची भौतिक प्रगती, प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार संस्थांच्या कामाची सद्य:स्थिती, नेमण्यात आलेल्या त्रयस्थ तपासणी संस्थांच्या कामाची सद्य:स्थिती, तालुकानिहाय योजनांच्या खर्चाचा तपशील, सिल्लोड मतदारसंघातील योजनांची सद्य:स्थिती याबाबत यावेळी चर्चा झाली.

मंत्री श्री. पाटील म्हणाले की, सिल्लोड – सोयगाव मतदारसंघातील जलजीवन अंतर्गत सिलोडमध्ये 117 व सोयगाव 31 अशा एकूण 148 योजनांचे काम काम प्रगतीपथावर आहे. यासाठी अंदाजित रक्कम 117 कोटी रुपये नियोजित करण्यात आली आहे. ‘हर घर नल से जल’अंतर्गत केलेल्या कामाच्या गावांची संख्या 24 असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

अजिंठा गावचे जुने जलशुद्धीकरण केंद्र जिल्हा परिषदेमार्फत दुरुस्ती करून घ्यावा, अशी सूचना त्यांनी यावेळी केली. फर्दापूर पाणीपुरवठा योजना व अजिंठा पाणीपुरवठा योजना या दोन्ही योजनांचे पुनर्जीवीकरण तातडीने करून करून या योजनेचे लोकार्पण लवकरच करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मंत्री श्री. सत्तार यांनी मतदारसंघातील वॉटर ग्रीड अंतर्गत गावांच्या सद्य:स्थितीबाबत माहिती दिली. तसेच पाणीपुरवठा योजनेअंतर्गत जलवाहिनी खोदकामामुळे होणारे नुकसान कामात होणारी दिरंगाई या अनुषंगाने मंत्री श्री. पाटील यांच्या निदर्शनास आणून दिले. रस्त्याची कामे व्यवस्थितरित्या करून दिले पाहिजे. तसेच रस्त्याचे खोदकाम झाले आहे तो अर्धवट न सोडता तयार करुन द्यावा, असेही मंत्री श्री. पाटील म्हणाले.

0000

प्रविण भुरके/वि.सं.अ./

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed