• Sat. Sep 21st, 2024

सावधान! पैशांसाठी बनावट प्रोफाइल्सचा सुळसुळाट, तुम्हीही होऊ शकता हॅकर्सचे शिकार, कशी खबरदारी घ्याल?

सावधान! पैशांसाठी बनावट प्रोफाइल्सचा सुळसुळाट, तुम्हीही होऊ शकता हॅकर्सचे शिकार, कशी खबरदारी घ्याल?

म. टा. प्रतिनिधी, नाशिक : फेसबुकवर अनेकांचे बनावट प्रोफाइल तयार करून त्याद्वारे इतरांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून सैन्यातील अथवा केंद्रीय राखीव पोलिस दलातील जवान असल्याचे भासवून आर्थिक फसवणूक करण्यात येत आहे. ‘माझा मित्र सैन्यात आहे. त्याचे फर्निचर विक्री करायचे आहे’, अशी बतावणी करून हजारो रुपयांचा गंडा घातल्याच्या तक्रारी सायबर पोलिसांत प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे पैशांसाठी ‘हॅकर्स’कडून होणाऱ्या या बनावापासून सावधान राहण्याचे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

काय आहे प्रकार?

– एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीच्या नावे बनावट फेसबुक प्रोफाइल तयार करण्यात येते. त्यामध्ये वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांसह सेवानिवृत्त अधिकारी व खासगी सेवेतील नामांकित व्यक्तींच्या नावे बनावट प्रोफाइल तयार झाले आहेत.
– फेक प्रोफाइलवरून खऱ्या प्रोफाइलवरील फ्रेंड्सला ‘रिक्वेस्ट’ पाठवली जाते.
– मेसेंजरमध्ये मोबाइल क्रमांक मागून व्हॉट्सॲपवर किंवा मेसेंजरमध्येच पुढील मेसेज केले जातात.
– मराठी, इंग्रजी व हिंदी भाषेत संशयित सायबर गुन्हेगार संपर्क साधत चॅटिंग अथवा फोन करतात.
– ओळख दर्शवून ‘माझ्या ओळखीतील एका जवानाची बदली झाली आहे. अथवा, त्याला पैशांची गरज असल्याने फर्निचर अथवा इतर किमती वस्तू विक्री करायच्या आहेत. त्यानुसार तुम्ही दिलेल्या मोबाइल क्रमांकावर पैसे पाठवा’, अशी बतावणी केली जाते.
– युजर्सचा विश्वास संपादित करण्यासाठी वस्तूंचे फोटो, पावती पाठविण्यात येते.
– प्रोफाइलवरील व्यक्ती ज्ञात असल्याच्या गैरसमजतातून काही युजर्स पैसे देतात. त्यानंतर लगेच त्यांना ‘ब्लॉक’ करण्यात येते.
– त्यानंतर आर्थिक फसवणूक झाल्याचे उघड होते.
मोबाइल हरवलाय? पोलिस ठाण्यात न जाता करा तक्रार नि मोबाइलही ब्लॉक, कसे ते वाचा
…अशी घ्या खबरदारी
– फेसबुक युजर्सने पासवर्ड बदलून प्रायव्हसी सेंटिंगमध्ये ‘प्रोफाइल लॉक’ करावे.
– नामांकित अथवा ओळखीच्या व्यक्तीच्या नावे नव्याने फ्रेंड रिक्वेस्ट आल्यास संबंधित प्रोफाइलची खातरजमा करावी.
– एखाद्याने मोबाइल क्रमांक मागून फर्निचर विक्री किंवा सैन्यातील अधिकारी अथवा जवान असल्याची बतावणी केल्यास त्वरित ब्लॉक करावे.
– संबंधित प्रोफाइलवर जात ‘रिपोर्ट’ म्हणत ‘फेक प्रोफाइल’ या पर्यायावर जात फेसबुककडे तक्रार करावी.
– एखाद्या व्यक्तीच्या नावे बनावट प्रोफाइल दिसल्यास त्याला ‘ब्लॉक’ करावे.
– कोणत्याही परिस्थितीत अनोळखी व्यक्तीला ई-स्वरूपात पैसे देऊ नये. वस्तू प्रत्यक्ष बघून खात्री केल्यानंतरच पुढील व्यवहार वस्तू ताब्यात घेतल्यावर करावे, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed