• Mon. Nov 25th, 2024
    ६ किमीवर वाहनतळ असूनही गर्दीचा उच्चांक, ८ ते १० लाख लोक सभेला, जरांगेंना अश्रू अनावर…

    म. टा. प्रतिनिधी, आंतरवाली सराटी : मराठा आरक्षणाच्या धगधगत्या प्रश्नावर मनोज जरांगे यांनी आवाहन केलेल्या महासभेसाठी आठ ते दहा लाख लोक उपस्थित राहिले. राज्यभरातून आलेल्या विराट जनसमुदायामुळे गोदापट्टा मराठा आरक्षणाच्या चळवळीचे केंद्रबिंदू ठरला. ही गर्दी एवढी होती की, सभा संपल्यानंतर वाहतूक सुरळीत होण्यास सात तास लागले. तर सहा किलोमीटर अंतरावर वाहनतळ असूनही सभेने गर्दीचा उच्चांक प्रस्थापित केला. या रेकॉर्डब्रेक सभेची सर्वत्र चर्चा सुरू होती.

    मागील दीड महिन्यांपासून आंतरवाली सराटी (ता. अंबड) गाव मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे केंद्र झाले आहे. या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केल्यानंतर आंदोलन चिघळले होते. आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी राज्यभर सभा घेऊन मराठा आरक्षणाची मागणी केली होती. या सभांनंतर शनिवारी महासभा घेण्यात आली. राज्यभरातून लाखो लोक सभेसाठी उपस्थित होते. ही अलोट गर्दी पाहून जरांगे यांना व्यासपीठावर अश्रू अनावर झाले. छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार घालून आणि अभिवादन करुन तसेच आईचे दर्शन घेऊन जरांगे यांनी सभेला सुरुवात केली. अनपेक्षित गर्दी आणि उन्हाचा वाढता पारा लक्षात घेत आमच्याकडून गैरसोय झाली असल्यास माफ करा, असे जरांगे म्हणाले.

    Manoj Jarange: राजकीय पुढाऱ्यांचं भोजन नको, आमची चटणी-भाकर पुरेशी; मराठा बांधव मनोज जरांगेंच्या सभेसाठी जालन्यात
    आंतरवालीपासून दीड किलोमीटर अंतरावरील रामगव्हाण शिवारातील १७० एकरांवर सभा झाली. गर्दीमुळे मोबाईलची नेटवर्क सुविधा बंद पडली होती. ‘सरकार सभेत अडथळे आणण्याचा प्रयत्न करीत आहे. इंटरनेट सुविधा बंद केल्यामुळे प्रसारमाध्यमांची अडचण झाली आहे. माझे फेसबुक अकाउंटही सकाळी बंद केले. पण, हा विशाल जनसागर कसा थोपवणार? असा सवाल जरांगे यांनी केला. जमलेल्या गर्दीशी खुला संवाद साधत जरांगे यांनी सभा गाजवली. छगन भुजबळ, गुणरत्न सदावर्ते यांचा शेलक्या शब्दात समाचारही घेतला. तसेच राज्य सरकारला पुढील आंदोलनाचा इशारा देताना उपस्थितांकडून हात उंचावून संमती घेतली. कर्नाटक आणि तेलंगणा या सीमावर्ती भागातील नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    २ वर्ष जेलमधून बेसन खाऊन आलात, फडफड करू नका, एकेरी उल्लेख करत जरांगे पाटलांनी भुजबळांना सुनावलं
    दरम्यान, सभेसाठी आलेल्या नागरिकांना रस्त्यात ठिकठिकाणी नाश्ता, चहा, पाण्याच्या बॉटल, बिस्कीट यांची व्यवस्था करण्यात आली होती. बदनापूर तालुका, पैठण तालुका आणि रस्त्यातील गावांनी नाश्त्याची मोफत व्यवस्था केली होती. सभेच्या ठिकाणी रुग्णवाहिका, अग्निशमन दलाची गाडी, पिण्याच्या पाण्याच्या गाड्या, टँकर उपलब्ध केले होते. हजारो स्वयंसेवक शिस्तीत सभेचे नियोजन करीत होते. जरांगे यांनीही आवाहन केल्यामुळे पोलिस प्रशासनावर ताण न पडता सभा शांततेत पार पडली.

    अनेक जण माझ्या मागे लागलेत, अजून एक लागला तरी फरक पडत नाही, मनोज जरांगेंच्या टीकेला छगन भुजबळांचं प्रत्युत्तर
    मध्यरात्री अडीच लाख लोक

    मनोज जरांगे यांची सभा गर्दीचे विक्रम प्रस्थापित करणार असल्याची चर्चा रंगली होती. सभेबाबत सोशल मीडियातून मोठा प्रचार करण्यात आला होता. त्यामुळे दूरच्या भागातील अडीच लाख लोक शुक्रवारी मध्यरात्रीपर्यंत आंतरवाली गावात पोहचले होते. जालना, बीड, छत्रपती संभाजीनगर, परभणी, नांदेड जिल्ह्यातील लोक शनिवारी सकाळी दाखल झाले. सभा सकाळी साडेअकरा वाजता होती. मात्र, सकाळी सात वाजताच रस्ते दुतर्फा वाहतुकीने बंद झाले होते. वाहने रस्त्याच्या बाजूला उभे करुन लोक सभेला पायी पोहचले.

    आम्ही पंढरपूर तालुक्यातून शुक्रवारी मध्यरात्री पोहचलो. मराठा आरक्षण महत्त्वाचा मुद्दा असल्यामुळे सर्वांनी उपस्थित राहणे आवश्यक वाटल्यामुळे आलो. ही गर्दी पाहून आनंद वाटला- संताजी गायकवाड, सुलतानपूर, जि. सोलापूर

    लाल गाडी, बाजूला मराठा बांधवांचा गराडा; मनोज जरांगे सभेसाठी रवाना

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *