जिल्हातील मुदखेड तालुक्यातील वाईवरदड येथील महिला शेतकरी सत्यभामा बालाजी कुंचलवार यांनी हे पोस्टर लावले आहे. त्यांच्या कुटुंबात पती, दोन मुले व एक मुलगी, असे त्यांच्यासह पाच सदस्य आहेत. मोठा मुलगा दहावी, दुसरा मुलगा सातवी तर, मुलगी पाचवी पर्यंत शिकले आहेत. वाईवरदड येथे त्यांची सात एकर शेती आहे. मागील तीन वर्षापूर्वी त्यांनी मुदखेडच्या खासगी सावकाराकडून दोन लाख रूपये कर्ज घेतले होते. दरम्यानच्या काळात त्यांनी काही पैसे फेडले होते. परंतु, कोरोनातील लॉकडाऊन काळात सर्वच ठप्प होते. त्यातच शेतीतूनही फारसे उत्पन्न मिळाले नाही. त्यामुळे घेतलेल्या कर्जाची परतफेड त्या करू शकल्या नाहीत, असे सत्यभामा यांनी सांगितले.
कर्ज फेडत नसल्याने त्यांना सावकाराकडून त्रास दिला जात असून त्यांनी गाव सोडून दिले आहे. तसेच शेती इतरांना करण्यास दिली तर, त्या लोकांनाही सावकराकडून त्रास दिला जात आहे. दरम्यानच्या काळात त्यांच्या एका मुलाला सर्पदंश झाला होता. त्यांनी मुंबईत त्याच्यावर उपचार केले. याच ठिकाणी मोलमजुरी करून पोटभरत आहेत. सत्यभामा या लोकांची धुणीभांडी करत असून मुलेही छोटी मोठी कामे करतात. त्यांची शिक्षणे थांबली आहेत. तसेच त्यांचे पती बालाजी आठ दिवस चांगले काम करतात. पुढे या घटनेमुळे मानसिक संतुलन बिघडते. त्यांना सावरण्यात बराचसा वेळ जातो, असे सत्यभामा यांनी सांगितले.
पोस्टरवर काय लिहिले?
पाच किडन्या विकणे आहे, संपर्कासाठी मोबाईल क्रमांक (8263089813) त्या खालोखाल इंग्रजीमध्ये सुध्दा Kidney is to sell असे लिहुन पुन्हा इंग्रजी अंकांमध्ये सुध्दा मोबाईल क्रमांक लिहिलेला आहे.
सावकाराच्या भीतीमुळे गाव सोडले
सावकारचे पैसे देणे आमचे काम आहे. मरण्यापेक्षा एक किडनी विकून व एका किडनीवर जगू. माझ्या मुलांना शिकवायचे आहे. कुटुंबात पाच जण आहे. त्यापैकी ज्यांची किडनी रुग्णाला फिट बसेल ती विकायची आहे. त्या पैशातून सावकाराचे पैसे द्यायचे आहेत. मी, नांदेडला येणार आहे आणि सर्व सविस्तरपणे सांगणार आहे. मला तुम्ही मदत करा. सावकाराच्या भीतीमुळे गाव सोडले असून जीव मुठीत धरून रहात आहे, असे सत्यभामा बालाजी कुंचलवार यांनी सांगितले.