११ ऑक्टोबर हा जागतिक दृष्टिदिन आहे. दरवर्षी ऑक्टोबरच्या दुसऱ्या गुरुवारी हा दिवस साजरा केला जातो. अंधत्व आणि दृष्टिदोषाकडे लक्ष वेधणे हा यामागील उद्देश आहे. २००० साली लॉयन्स क्लब इंटरनॅशनल फाउंडेशनच्या साइट फर्स्ट मोहिमेद्वारे या दिनाची सुरुवात झाली होती.
अलीकडच्या काळात वाढलेला स्क्रीनटाइम, धूम्रपान यांमुळे दृष्टी धोक्यात आली आहे. करोनाकाळात आलेल्या ऑनलाइन कल्चरमुळे दृष्टीचे आयुष्य कमी झाले आहे. त्यासाठी आपल्याला काही खबरदारी घ्यावीच लागेल. त्याचप्रमाणे धूम्रपानामुळे दृष्टिपटलावर सूज येते व नजर हळूहळू कमी होत जाते. यातून कायमचे अंधत्वदेखील येऊ शकते. करोनानंतर आपल्या जीवनशैलीत बरेच बदल झाले. अगदी लहान वयात मुलांच्या हाती मोबाइल आले. सर्वच क्षेत्रांत संगणकीकरण झाल्यामुळे प्रत्येक काम कम्प्युटरवर होऊ लागले. जीवनशैलीतील या बदलामुळे चष्म्याचा नंबर वेगाने वाढतो आहे. त्याचप्रमाणे पूर्वी वयाच्या चाळिसाव्या वर्षी किंवा त्यापुढे नंबरचा चष्मा लागायचा. मात्र, आता सर्वसाधारणपणे ३७-३८व्या वर्षी किंवा त्याआधीही चष्मा लागत असल्याचे आपले निरीक्षण असल्याचे नेत्रतज्ज्ञ डॉ. राजेश जोशी यांनी सांगितले. याला कोणताही शास्त्रीय आधार नाही. मात्र, आपल्याकडे येणाऱ्या रुग्णांच्या वयावरून हे लक्षात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शालेय जीवनापासूनच करा मुलांची नेत्रतपासणी!
लहान मुलांच्या बाबत बरेचदा दृष्टिदोष लक्षात येत नाहीत. शाळेत मुले मागील बाकावर बसत असतील आणि त्यांना फळ्यावरचे दिसत नसेल तर मग चष्म्याची गरज असल्याचे लक्षात येते. त्यामुळे शालेय जीवनापासूनच मुलांची नेत्रतपासणी करणे गरजेचे आहे. लहान मुलांना लागलेला चष्मा पुढे सुटतो, असा काहींचा समज असतो. मात्र, ९५ टक्के प्रकरणांमध्ये चष्मा कायमच राहतो, असेही डॉक्टर सांगतात. डोळ्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आहारात हिरव्या भाज्या, लाल-पिवळी फळे यांचा समावेश असावा, उन्हात जाताना गॉगल वापरा, डोळ्यांची नियमित तपासणी करा, व्यायाम नियमित करा, असा सल्लाही डॉक्टरांनी दिला.