श्री. करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. विशेषतः नवरात्र उत्सव काळात ही संख्या लाखांच्या घरात जात असते आणि या सर्वांची चप्पल ठेवण्यासाठी अंबाबाई मंदिर परिसरात मोठी गर्दी होत असते. शिवाय गेल्या काही दिवसांपूर्वी देवस्थान व्यवस्थापन समितीकडून स्वतंत्र चप्पल स्टॅंण्ड तयार करण्यात आले आहे. यामुळे यंदा नवरात्र उत्सवाची संधी साधत गेल्या अनेक वर्षांपासून मंदिर परिसरात असलेलं चप्पल धारकांचे स्टॅन्ड कोल्हापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने काढून टाकले.
सकाळी अकरा वाजेच्या सुमारास महानगरपालिकेचे अतिक्रमण विभागाचे अधिकारी अंबाबाई मंदिर परिसरात दाखल झाले. यावेळी मंदिराच्या सुरक्षा भिंतीला लागून असलेले हे चप्पल स्टॅंण्ड अतिक्रमण विभागाने काढण्यास सुरुवात केली. यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या चप्पल चप्पल धारकांचा रोजगार हिरावला जात असल्याने चप्पल स्टॅंण्डधारक आणि महानगरपालिका अधिकाऱ्यांमध्ये मोठा संघर्ष निर्माण झाला होता. मात्र, अतिक्रमण विभागाकडून जेसीबीद्वारे अतिक्रमण काढण्यास सुरुवात करण्यात आली. यावेळी चप्पल स्टॅंण्ड धारकांकडून तर जोरदार विरोध करण्यात आला. यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू जाधव यांनी देखील या कारवाईला विरोध केला. यावेळी पोलीस आणि आंदोलक यांच्यामध्ये जोरदार झटापटही झाली या झटापटीत काही जणांना दुखापत देखील झाली.
“सदर चप्पल स्टॅंण्ड हा आमच्या उदरनिर्वाहाचं साधन आहे. या माध्यमातून आम्ही गेल्या कित्येक वर्षांपासून आई अंबाबाईची सेवा देखील करतो. तुम्ही हे स्टॉल हटवू नका. आम्हाला दोन दिवस द्या”, अशी विनंती चप्पल स्टँण्डधारकांकडून महानगरपालिका आणि पोलिसांना करत होते. तसेच “तुम्हाला आमचे स्टॉलच दिसतात का समोर मंदिराकडून लावण्यात आलेले लाडू प्रसाद केंद्र तसेच अन्य चप्पल दुकान दिसत नाही का त्यांच्यावर ही कारवाई करा”, अशी मागणी स्टॉल धारकांकडून करण्यात येत होती. मात्र, पोलिसांनी या सर्व गाळेधारकांना बाजूला करून अतिक्रमण काढून घेतलं. यामुळे संतापलेल्या या गाळेधारक त्या ठिकाणी ठिय्या मांडून बसले आहेत. तब्बल दीड तास चाललेल्या या कारवाई दरम्यान अंबाबाई मंदिर परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं.
Read Latest Maharashtra News And Marathi News