अहमदनगरच्या सीताराम सारडा विद्यालयाचे मुख्याध्यापक हेरंब कुलकर्णी यांना शनिवारी दुपारी सावेडीतील रासनेनगर भागात हल्लेखोरांनी स्टीलच्या रॉडने मारहाण केली. यावेळी त्यांच्यासमवेत असलेले सहकारी शिक्षक सुनील कुलकर्णी यांनाही मारहाण झाली. पोलिसात तक्रार दिल्यावर व सरकारी रुग्णालयात उपचार घेऊन घरी आल्यावर त्यांनी कुटुंबीयांना ही माहिती दिली. त्यांनी ती सामाजिक कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवली व सोशल मिडियातूनही व्हायरल केली. नगरच्या दौर्यावर असलेल्या खा. सुप्रिया सुळेंनी ती पाहिल्यावर सारा दौरा थांबवून त्यांनी हेरंब कुलकर्णींच्या घरी धाव घेतली. यावेळी माध्यमांशी बोलताना हेरंब कुलकर्णी यांनी आपबिती सांगितली.
मला मारहाण करण्याची घटना दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली, त्यानंतर मी पोलिस ठाण्यात गेल्यावर मला चार तास बसवून ठेवले. दुसर्या दिवशी पंचनामा व जबाबासाठी गेल्यावरही दोन तास थांबवले. मात्र, सामाजिक कार्यकर्त्यांनी हल्ल्याचा निषेध करणारे निवेदन दिल्यावर, तुम्ही कोणीतरी वेगळे असल्याचे व मोठे असल्याचे आधी सांगायचे ना राव…अशा शब्दात पोलिसच माझ्यावर डाफरले…मुख्याध्यापक हेरंब कुलकर्णींचे हे भाष्य ऐकून खा. सुप्रिया सुळेंनी डोक्याला हात लावला व म्हणाल्या, गृहमंत्री कॉमन माणसाला कशी वागणूक मिळते ते पाहा.
तुम्ही मोठे कार्यकर्ते असल्याचे अगोदरच सांगायचे ना…
कुलकर्णी म्हणाले, मी अकोल्यात शिक्षक असताना दोनशेवर बालविवाह रोखले, दारूडे पकडून दिले, अवैध दारू धंद्याविरुद्ध आवाज उठवला. अकोल्यात माझ्या या मोहिमेला यश आले. त्यामुळे मला कोणीही हात लावणार नाही, या धुंदीत मी नगरला मुख्याध्यापक झाल्यावर काम सुरू केले. सारडा विद्यालयाजवळ तब्बल ४४ वर्षांपासून असलेली गुटका-तंबाखू-माव्याची टपरी बंद केली. शाळेच्या शंभर मीटर परिसरात तंबाखू विक्री नको, या शासनाच्याच आदेशाचा आधार मी घेतला. पण, माझ्याशी भांडणे केली गेली. मागच्या २४ तारखेला तर काहीजण शाळेतच मला मारायला आले होते. पण मी माझे काम सुरू ठेवले. शाळेजवळ अनधिकृत लावल्या जाणार्या चारचाकी वाहनांमुळे मुलांना शाळेत यायला अडचण होत असल्याने त्या दोन गाड्यांना प्रत्येकी दीड हजाराचे दंड केले. त्या रागातून माझ्यावर जीवघेणा हल्ला झाला व पोलिस आता म्हणतात, तुम्ही मोठे व वेगळे असल्याचे आधीच सांगायचे ना. पण सामान्य माणसाला पोलिसांकडून कशी वागणूक मिळते, हेही मला पाहायचे होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शहरी भागात गुंडांची हिंमत वाढते आहे व तिला नगरसेवक-आमदारांकडून ताकद दिली जात असल्याने टोळ्या वाढल्या आहेत. यात दाभोलकर-कलबुर्गी होण्याची शक्यता असल्याने यापुढे कोणीही सामाजिक कामाचे धाडस करणार नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, हेरंब व माझे बहीण-भावाचे नाते आहे. शिक्षण क्षेत्रात त्यांचे मोठे नाव आहे. कोविड विधवांसाठी त्यांनी अप्रतिम काम केले आहे. त्यामुळे त्यांच्यावरील हल्ला धक्कादायक आहे. हल्लेखोरांवर कडक कारवाई होईपर्यंत मी या घटनेचा पाठपुरावा करणार आहे, असे खा. सुळे यांनी यावेळी केले.
हेरंब कुलकर्णी यांना आता पोलिस संरक्षण देण्यात आले आहे. त्यांच्या घरी आणि त्यांच्यासोबतही राहणार आहेत. घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे. लवकरच आरोपींना पकडले जाईल, असे पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी सांगितले.