• Sat. Sep 21st, 2024

पुण्यातील ३३ धोकादायक ठिकाणावरील अपघात टळणार? जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या महत्त्वाच्या सूचना

पुण्यातील ३३ धोकादायक ठिकाणावरील अपघात टळणार? जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या महत्त्वाच्या सूचना

पुणे : पुणे शहरातील ३३ ‘ब्लॅक स्पॉट’वर गेल्या तीन वर्षांत ३०६ अपघातांमध्ये २३९ मृत्यू झाले. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले आहे. या ठिकाणी वारंवार अपघात का होतात, याचे संयुक्त सर्वेक्षण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय); तसेच महापालिकाला प्रशासनास दिले आहेत.

पुणे शहरासह जिल्ह्यातील दुचाकीसह चारचाकीच्या वाढत्या अपघातावर नियंत्रण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि अन्य विभागांच्या अधिकाऱ्यांना पुण्यासह पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यात संयुक्त सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, ऑक्टोबर महिन्यात संयुक्त सर्वेक्षण करण्यात येणार असून, त्यानंतर पूर्वीच्या आणि नव्याने कोणत्या उपाययोजना कराव्या लागणार आहेत, याची दिशा स्पष्ट होणार आहे.

भारताविरोधात बोलला की ठोकला, मोसादपेक्षाही थरारक कारवाया नेमक्या कुणाकडून?

शहर जिल्ह्यातील विविध भागांत ६३ ‘ब्लॅक स्पॉट’ निश्चित केले आहेत. त्यात पुणे शहरात ३३, पिंपरी-चिंचवड शहरात १९ आणि जिल्ह्यातील ग्रामीण भागात ११ असे स्पॉट आहेत. जिल्ह्यातील ‘ब्लॅक स्पॉट’पैकी सर्वाधिक ‘ब्लॅक स्पॉट’ पुण्यात आहेत. त्या पार्श्वभूमीवर, उपाययोजना करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. पुण्यातील काही रस्त्यांवरील अपघाताची ठिकाणे सार्वजनिक बांधकाम, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे (एनएचएआय); तसेच महापालिकेकडे आहेत. त्यामुळे त्या त्या विभागांकडून त्यांच्या पद्धतीने उपाययोजना करण्यात येणार आहेत, असे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

ऑक्टोबर महिन्यात सर्वेक्षण

जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत शहरासह जिल्ह्यातील अपघातांच्या ‘ब्लॅक स्पॉट’बाबत सर्वेक्षणाचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम, ‘एनएचएआय’, प्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ), पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अधिकारी, रस्ते विकास महामंडळासह पोलिस अधिकाऱ्यांसह संयुक्त सर्वेक्षण करण्यात येणार आहे. येत्या ऑक्टोबर महिन्यात सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यानंतर उपाययोजना सुरू होतील, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

विविध उपाययोजना

शहरासह जिल्ह्यातील अपघाताच्या ‘ब्लॅक स्पॉट’ची एकत्रित पाहणी केल्यानंतर त्या त्या ठिकाणी कोणत्या प्रकारच्या उपाययोजना कराव्या लागतील, याचे चित्र स्पष्ट होईल. त्या ठिकाणी दीर्घकालीन किंवा ठरावीक काळासाठी उपाययोजना निश्चित करण्यात येतील. अपघाताच्या ठिकाणी वाहनांचा वेग नियंत्रित करण्यासाठी आवश्यक तेथे वेग नियंत्रणासाठी रस्त्यावर रम्बलर्स बसविणे, थर्मोप्लास्टिक रोड मार्किंग्ज, सूचना फलक, रस्त्यावरील परावर्तक, ब्लिंकर्स, रिफ्लेक्टर्स आदी उपाय करण्यात येतील, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

पुणे शहर जिल्ह्यातील अपघातांच्या ‘ब्लॅक स्पॉट’बाबत सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार लवकरच सर्वेक्षण करण्यात येईल. सार्वजनिक बांधकाम विभागासह ‘एनएचएआय’ने पुणे- नाशिक, पुणे- सोलापूर आणि पुणे- नगर महामार्गावर काही अपघाताच्या ठिकाणी उपाययोजना सुरू केल्या आहेत. सर्वेक्षणातून आढळलेल्या ठिकाणीही उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
– डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी

पुणे-नाशिक, पुणे-सोलापूर, पुणे-सातारा या तीन महामार्गांवरील ‘ब्लॅक स्पॉट’ आम्ही शोधले आहेत. त्यावर काही ठिकाणी उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. पुन्हा एकत्रितपणे सर्वेक्षण करण्यात येईल.
– संजय कदम, प्रकल्प संचालक, ‘एनएचएआय’

‘एनएचएआय’कडील पुण्यातील अपघातांची ठिकाणे

भागाचे नाव: अपघाताच्या ठिकाणाचे नाव

हडपसर : वैदवाडी चौक, फुरसुंगी फाटा, फुरसुंगी रेल्वे पूल, सासवड रोड; आयबीएम कंपनी, सासवड रोड
भारती विद्यापीठ रस्ता : दरी पूल, कात्रज चौक सातारा रस्ता, नवा कात्रज बोगदा
सिंहगड रस्ता : नवले पूल, भूमकर पूल
वारजे : मुठा नदी पूल, डुक्कर खिंड, माई मंगेशकर रुग्णालय परिसर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed