त्यानंतर घरी हळद लावलेल्या पाण्यावरून त्या महिलेने चालत येऊन बाप्पाच्या शेजारी तो कलश म्हणजेच गौरी आणून ठेवायची असते. त्यानंतर पुन्हा एकदा घरातील सर्व मंडळी गौरीची पूजा करतात. दुपारी या गौरीला गोड नेवैद्य दाखवला जातो.दुसऱ्या दिवशी गौरीला माहेरवासीन मानुन अलंकार घालून सजवले जाते. त्यावेळी तिला मटणाचा नेवैद्य दिला जातो.अर्थात तळकोकणात ही सर्वत्र वेगवेगळ्या प्रथा,परंपरा जोपासल्या जातात. हेच तर कोकणच्या गणेशोत्सवाचे वैशिष्ट्य आहे.
आज तळकोकणात पारंपरिक पद्धतीने गौरी पूजन करण्यात आले. सुंदर मुखवटाधारी गौरीच्या प्रतिमेला सालंकृत नटवले जाते. गौरीला विविध प्रकारच्या दागदागिन्यांनी नटवले तरी गौरीचा शृंगार हा काकडीच्या फुलांच्या हारा शिवाय पूर्ण समजला जात नाही. केवळ तळ कोकणात गौरीच्या पुढ्यात वसा देण्याचा विधी केला जातो. पाच प्रकारच्या वनस्पतीची पाने यामध्ये काकडी , भोपळा ,पडवळ,करांदे आणि चिना या फळभाज्या आणि कंदमुळे यांची पाने असतात. त्यावर पाच प्रकारचे जिन्नस रचून हा प्रतिकात्मक ओवासा अर्थात वसा घरातील वडीलधारी मंडळी पुढील पिढीला देतात. यात घराण्याच्या रूढी,परंपरा, चालीरीती पुढील पिढीला देण्याची भावना असते. गौरी पूजनासाठी औषधी वनस्पतींचा वापर केला जातो हे विशेष. गणेशला संपूर्ण शाकाहारी नैवद्य दाखवला जातो तर कोकणात काही ठिकाणी मात्र माहेरवाशीण आलेल्या गौरीला मासांहारी सागोती वडे याचा नैवेद्य दाखवला जातो.
गौरीचे विधिवत पूजन केल्यानंतर गणपती विसर्जनावेळी गौरीचे विसर्जन करण्यात येते.माहेरवाशीण असलेल्या गौरीला निरोप देण्यासाठी सुहासिनी काहीशा उदास असतात. कारण माहेरवाशिणची सुख दुःख ते आपल्या लाडक्या गौरीलाच कथन करत असतात. सर्वांना आणि संपूर्ण कुटुंबाला सुखी करण्याचे गाऱ्हाणे करून गौरी विसर्जनला निघते. गौरीचे विसर्जन प्रतिकात्मक पारंपरिक पद्धतीने केले जाते. पाच औषधी वनस्पती यामध्ये हळद ,तुळस,आघाडा,लाल माठ, तेरडा याची रोपे एका रवळीमध्ये ठेवून बसवलेल्या गौरीचे विसर्जन विहिरीच्या काठी केले जाते. शेणाने सडा करून विधिवत ही रोपे तिथे ठेवली जातात तर काही ठिकाणी ही रोपे विहिरीमध्ये सोडली जातात. यावेळी गौरीचा आवडता पालेभाजी आणि भाकरीचा प्रसाद सर्वांना दिला जातो. गौराई मायकडून पुढील वर्षी लवकर येण्याचे वचन घेत महिला गौरीचा निरोप घेतात.