मुंबई, दि. २२: सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागांतर्गत अनुसूचित जातींच्या सामाजिक व आर्थिक विकासाकरिता स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने वैयक्तिक अर्जदारांना उद्योग अथवा व्यवसाय करण्यासाठी कर्ज उपलब्ध केले जाते. मुंबई शहर व उपनगरातील अनुसूचित जातीमधील मातंग पोटजातीतील अर्जदारांनी १० ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक अंगद कांबळे यांनी केले आहे.
थेट कर्ज योजनेंतर्गत एक लाख रुपये कर्ज उपलब्ध करुन देण्यात येते. अनुसूचित समाजाच्या जातीतील मांग, मातंग, मिनी मादिंग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमां, मांग गारुडी, मांग गारोडी, मदारी मादगी या १२ पोटजातीतील इच्छुक अर्जदार या कर्जासाठी अर्ज करू शकतात. विहित कालावधीत जिल्हा कार्यालय मुंबई शहर-उपनगर, गृहनिर्माण भवन, कलानगर, तळमजला, या पत्त्यावर अर्ज व मूळ दस्तावेजासह स्वत: साक्षांकित करून सादर करावेत. अधिक माहितीसाठी ०२२- २६५९११२४ अथवा [email protected] यावर संपर्क साधावा, असे श्री. कांबळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
०००
श्रद्धा मेश्राम/ससं/