यवतमाळ, दि. १८ (जिमाका) : दिग्रस शहराच्या विकासासाठी शंभर कोटींचा डिपीआर तयार करण्यात आला आहे. या माध्यमातून दिग्रस शहराचा कायापालट करुन सुंदर शहर निर्माण होणार असल्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले.
पालकमंत्री संजय राठोड यांच्या प्रयत्नातून वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत दिग्रस नगरपरिषद क्षेत्रातील हिंदु स्मशानभूमी सभोवताल आवार भिंत बांधणे व सौदर्यींकरणाच्या कामांसह भाजी मार्केट विकसित करण्यात येणार आहे. या ७ कोटी ६३ लाख रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य महादेव सुपारे, नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष विजय बंग, मुख्याधिकारी ज्ञानेश सोनवाणे, तहसिलदार सुधाकर राठोड आदी उपस्थित होते.
दिग्रस शहराच्या विकासासाठी शंभर कोटींचा डिपीआर तयार करण्यात आला आहे. लवकरच त्याला मंजुरी मिळेल. या विकास आराखड्याच्या माध्यमातून दिग्रस शहराचा कायापालट करुन सुंदर शहर निर्माण होणार आहे. मागच्या काळात विविध विकासकामे केले आहेत. येणाऱ्या काळात शहरामध्ये भूमिगत विद्युत व्यवस्था, पाईपलाईन यासह सिमेंट रस्ते, ई-लायब्ररी, युवकांसाठी व्यायामशाळा, दिग्रसवासियांना मुलभूत सोयीसुविधा, बेरोजगारांना रोजगाराच्या संधी निर्माण करण्यात येणार आहे. शहरी आणि ग्रामीण भागामध्ये विकासाची कामे केली जाणार आहेत, असेही पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले.
दिग्रसमध्ये आदर्श मोक्षधाम करण्याचा आराखडा तयार करा
वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत हिंदु स्मशानभूमी सभोवताल आवार भिंत बांधणे व सौदर्यींकरणाची कामे मंजूर करण्यात आली आहेत. या कामाची अंदाजपत्रकीय रक्कम ५ कोटी ७ लाख ९८ हजार रुपये इतकी आहे. दिग्रस येथील मोक्षधाम परिसर सर्वदृष्टीने विकसित व्हावा यासाठी प्रयत्न करणार आहे. राज्यामध्ये जेवढे मोक्षधाम विकसित झाले आहे. त्यांचा विकास आरखडा एकत्र करुन दिग्रसमध्ये आदर्श ठरेल, असा मोक्षधाम निर्माण करण्याचा आराखडा तयार करावा. जेणेकरुन दिग्रस येथील मोक्षधाम पाहण्यासाठी राज्यभरातून लोक येतील. यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले.
भाजी मार्केटचे भूमिपूजन
नगरपरिषदेमार्फत वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत २ कोटी ५५ लाख १४ हजार रुपये अंदाजपत्रकीय रक्कमेचे भाजी मार्केट विकसित करण्यात येणार आहे. हे भाजी मार्केट नागपूर विमानतळाच्या धर्तीवर विकसित करण्यात येणार आहे. या भाजी मार्केटमध्ये १६ ओटे, शेड, महिला पोलिसांसाठी शौचालय बांधण्यात येणार आहे. या भाजी मार्केटच्या कामाचे भूमिपूजन पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. सुरुवातीस मुख्याधिकारी ज्ञानेश सोनवाणे यांनी प्रास्ताविक केले.
०००
दारव्हात सुसज्ज बचत भवन आणि बॅडमिंटन हॅाल बांधकामाचे भूमिपूजन
दारव्हा नगरपरिषद हद्दीतील जुन्या बचत भवनाच्या क्षतीग्रस्त इमारतीच्या जागेवर सुसज्ज बचत भवन आणि बॅडमिंटन हॅाल बांधण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी डॅा. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॅा. मैनाक घोष, पोलीस अधीक्षक डॅा. पवन बनसोड, उपविभागीय अधिकारी संजय खडसे, उपविभागीय पोलीस अधिकारी आदित्य मिरखेलकर, तहसिलदार विठ्ठल कुमरे, मुख्याधिकारी विठ्ठल केदारे आदी उपस्थित होते.
वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत या बचत भवन आणि बॅडमिंटन हॅाल बांधकाम केले जाणार आहे. या कामाची अंदाजपत्रकीय रक्कम सहा कोटी ९९ लाख ५२ हजार ६५६ इतकी आहे.