शरद पवार गटाने पिंपरी चिंचवड शहरात राष्ट्रवादीचे मध्यवर्ती कार्यालय सुरू केले आहे. त्यातच शहराध्यक्ष पदाची धुरा युवा नेतृत्वाकडे देण्यात आली आहे. तुषार कामठे हे आता अजित पवार गटाला शह देण्यासाठी तयारीला लागले आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते कामठे यांना नियुक्ती पत्र देण्यात आले आहे. शुक्रवारी झालेल्या बैठकीनंतर ही नियुक्ती करण्यात आली असल्याचे निकटवर्तीयांनी सांगितले आहे.
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून त्यांनी नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी आमदार रोहीत पवार, युवक राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष रविकांत वरपे, विद्यार्थी सेलेचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, युवकचे शहराध्यक्ष इम्रान शेख आदी उपस्थित होते.
अजित पवार यांनी भाजपा- शिवसेना युती सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राष्ट्रवादीत दोन गट पडले होते. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी अजित पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शरद पवार गटाचे शहराध्यक्षपद रिक्त होते. तुषार कामठे यांनी शहराध्यक्षपदी जबाबदारी स्वीकारली असून, आगामी काळात भाजपाचे शहराध्यक्ष शंकर जगताप, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्याविरोधात कामठे मोहीम उघडणार आहेत, असे चित्र आहे.
कोण आहेत तुषार कामठे?
शरद पवार गटाचे शहराध्यक्ष म्हणून कामठे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तुषार कामटे हे २०१७ च्या महापालिका निवडणुकीत भाजपच्या चिन्हावर निवडून आले होते महापालिकेचा शेवटचा कार्यकाळ बाकी असताना त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. भाजप सोडण्यापूर्वी त्यांनी भाजपच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. यामुळे कामठे यांची चर्चा शहरभर झाली होती. आता भाजप, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना अशा तीन पक्षाला रोखण्याचे आव्हान कामठे यांच्यापुढे असणार आहे. अजित पवार गटाच्या शहराध्यक्षपदी अजित गव्हाणे आहेत.