• Sun. Sep 22nd, 2024
टोलमाफी असतानाही एक्स्प्रेस वेवर गणेशभक्तांच्या फास्टॅगमधून पैसे कट, सरकारची घोषणा फसवी?

कुणाल लोंढे, नवी मुंबई (पनवेल) : गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोलमाफी देण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु टोलनाक्यावर बसवलेल्या फास्टॅगमधून टोलमाफी कशी मिळणार याबाबतची माहिती टोलमाफीच्या घोषणेत नसल्यामुळे टोलनाक्यावर पोहोचलेल्या अनेक गणेशभक्तांच्या वाहनांवरील फास्टॅगमधून परस्पर टोलची रक्कम कापली गेली. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर डाव्या बाजूची एक मार्गिका टोलमाफीचा पास असलेल्यांसाठी ठेवण्यात आली होती. त्यामुळे पास असूनही फास्टॅगमधून पैसे कापले जात असल्याचे अनेकांनी सांगितले.

राज्यातील टोलनाक्यांवर आता पूर्वीप्रमाणे रोख पैसे घेऊन टोल वसूल केला जात नाही. टोलवसुलीसाठी वाहनांवर फास्टॅग लावण्यात आले आहेत. वाहन टोलनाक्यावर उभे राहिले की, फास्टॅग स्कॅन होऊन अवघ्या काही सेकंदात टोलची रक्कम कापली जाते. नव्या तंत्रज्ञानाची अंमलबजावणी होऊन बराच अवधी उलटला आहे. कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना आर्थिक दिलासा देण्यासाठी मागील काही वर्षांपासून गणेशभक्तांना टोलमाफी दिली जात आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही टोलमाफीची घोषणा करण्यात आली.

Maharashtra Weather Forecast: हलक्या सरींमध्ये बाप्पाचे आगमन? तर उत्तर मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता
टोलमाफीसाठी परिवहन विभाग, वाहतूक पोलिस, आरटीओ आदींकडून पास मिळण्याची व्यवस्था करण्यात आली. टोलमाफीचा पास मिळणे अत्यंत सोपे असले, तरी प्रत्यक्ष टोलनाक्यावर टोलमाफी मिळवणे अवघड आहे. शुक्रवारपासून मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर डाव्या बाजूची एक मार्गिका टोलमाफी पासधारकांसाठी ठेवल्याचे सांगितले जाते. परंतु या मार्गिकेवर सदैव अवजड वाहनांच्या रांगा लागलेल्या असल्यामुळे, वाहनचालक नेहमीप्रमाणे चारचाकी वाहनांच्या रांगेत जातात. या रांगेतून पुढे गेल्यावर टोलनाक्यावर फास्टॅग स्कॅन करून अवघ्या काही सेकंदात पैसे कापून घेतले जातात. त्यामुळे पास दाखवायच्या आतच टोल कापला जातो. त्यामुळे एक्स्प्रेस वेवर गणेशभक्तांचा गोंधळ उडत आहे.

गणेशभक्तांना टोलमाफी असल्यामुळे अनेक कोकणवासी मुंबई-गोवा महामार्गावरून खडतर प्रवास करण्यापेक्षा एक्स्प्रेस वेने मुंबई-बेंगळुरू मार्गाने कोल्हापूरमार्गे कोकणात जाण्यास पसंती देतात. त्यामुळे एक्स्प्रेस वेवर शुक्रवारपासून गर्दी होण्यास सुरुवात झाली आहे. टोलमाफीचा पास असलेल्या वाहनांसाठी टोलनाक्यावर चारचाकी वाहनांच्या मार्गिका राखीव ठेवणे आवश्यक आहे. मात्र प्रस्तक्षात केवळ डाव्या बाजूची एक मार्गिका राखीव ठेवली आहे. ती गाठणे कठीण जात असल्याने, अनेक वाहने नाईलाजास्तव चारचाकीच्या मार्गिकेवर जातात आणि टोलचे पैसे परस्पर कापले जातात. मुंबईतील इंट्री पॉइंटसह, राजीव गांधी सागरी सेतू, यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गावर गणेशभक्तांना टोलमाफी देण्यात आली आहे. टोलमाफी कोणत्या मार्गिकेवर आहे, याबाबत टोलनाक्यापूर्वी जनजागृती केलेली नाही. त्यामुळे टोलमाफीची घोषणा झाली असली, तरी प्रत्यक्षात टोलमाफी प्राप्त करणे गैरसोयीचे असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

आयआरबीकडून बोलण्यास नकार

आयआरबीचे वरिष्ठ अधिकारी कर्नल जोशुवा यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता, वरिष्ठांना कळवून सांगतो, असे उत्तर त्यांनी दिले. परंतु रात्री उशिरापर्यंत त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळू शकला नाही.

पासधारकांना टोलमाफीसाठी डाव्या बाजूची मार्गिका ठेवण्यात आली आहे. पासची तपासणी करून शुक्रवारपासून वाहने सोडली जात आहेत. टोलपूर्वी फलकदेखील लावण्यात आले आहेत.

– मन्सूर डांगे, ड्युटी इन-चार्ज

Konkan Ganeshotsav: कोकणात गणपतीसाठी विमानाने जाताय; मोजावे लागतील ‘इतके’ रुपये

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed