पिंपरी : शिवसेना फोडल्यानंतर राष्ट्रवादीत देखील उभी फूट पाडून अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस यांच्यासोबत जात सत्तेत सहभागी झाले. त्यामुळे राज्याच्या राजकारणात शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट पडले. त्यामुळे अनेक राजकीय समीकरणे देखील बदलण्यास सुरुवात झाली आहे. अजित पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरी चिंचवड शहरात त्यांचे मध्यवर्ती कार्यालय सुरू करण्यात येणार आहे. त्याचं शरद पवार गटाकडून पिंपरी चिंचवड शहरात मध्यवर्ती कार्यालय उभारले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात पिंपरी चिंचवड शहरात पवार विरुद्ध पवार असाच सामना पहायला मिळू शकतो.
अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून फारकत घेल्यापासून आपली ताकद दाखवण्यास सुरुवात केली आहे. नव्याने उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी सर्वात प्रथम पिंपरी चिंचवड शहरातच शक्ती प्रदर्शन केले होते. साडेपाचशे किलोचा हार घालून त्यांचे स्वागत करण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी आपली ताकद दाखवण्यासाठी पुण्यात देखील पुणे ते खेड शिवापूरपर्यंत रॅली काढली होती.
त्यानंतर शरद पवार देखील ॲक्टिव्ह झाल्याचे पहायला मिळत आहे. त्यांनी देखील पुण्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत बैठक घेण्यास सुरुवात केली आहे. त्यातच शरद पवार गट पिंपरी चिंचवडमध्ये देखील ॲक्टिव्ह झाल्याचे पाहायला मिळतं आहे. मध्यवर्ती कार्यालय उभारून त्यांनी हम भी किसी से कम नहीं है दाखवून देत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. पिंपरी चिंचवडच्या काळेवाडी परिसरात हे कार्यालय उभारण्यात आले आहे. या कार्यालयाचे उद्घाटन होणे अद्याप बाकी आहे. त्यामुळे या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी शरद पवार पिंपरी चिंचवड येथे आपली ताकद दाखवण्यासाठी शक्ती प्रदर्शन करणार का? हे आता येत्या काही दिवसात पाहायला मिळणार आहे.