• Fri. Nov 29th, 2024

    मुंबईकरांचे जीवन सुसह्य होण्यात अभियंत्यांचे योगदान महत्त्वपूर्ण – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    ByMH LIVE NEWS

    Sep 15, 2023
    मुंबईकरांचे जीवन सुसह्य होण्यात अभियंत्यांचे योगदान महत्त्वपूर्ण – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    मुंबई, दि. १५ : मुंबईकरांचे जीवन सुसह्य झाले पाहिजे.  मुंबईकरांना सोयी सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत. यासाठी मुंबईत गेल्या वर्षभरात एक लाख कोटींहून अधिक रकमेचे पायाभूत सुविधा प्रकल्प सुरू करण्यात आले असून मुंबईकरांचे जीवन सुसह्य होण्यात अभियंत्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अभियंत्यांचा गौरव केला.

    भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त बृहन्‍मुंबई महानगरपालिकेतर्फे रवींद्र नाट्य मंदिर येथे राष्ट्रीय अभियंता दिन सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. खासदार राहुल शेवाळे, वंदे भारत ट्रेनचे जनक सुधांशू मणी, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तसेच प्रशासक इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त पी. वेलरासू, उपायुक्त उल्हास महाले आदी यावेळी उपस्थित होते.

    मुख्यमंत्री म्हणाले, मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर आहे. येथील रहिवाशांना अपेक्षित अशा सोयी सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत. यासाठी सरकारने मोठ्या प्रमाणात विकास प्रकल्प हाती घेतले आहेत. मुंबईला अधिक वेगवान करणारा सागरी किनारा मार्ग, एमटीएचएल प्रकल्प, मुंबई मेट्रोचे जाळे, समृद्धी महामार्ग, मुंबई-पुणे मार्ग हे अभियंत्यांच्या मेहनतीचा परिणाम असल्याचे त्यांनी सांगितले. येत्या दोन वर्षात दोन टप्प्यात मुंबईतील सर्व रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात येणार असून खड्डेमुक्त रस्त्यांचे उद्दिष्ट असल्याचे ते म्हणाले.

    अभियंत्यांनी कामाचा दर्जा राखावा, मुंबईकरांना दर्जेदार सुविधा द्याव्यात, शासन देखील पूर्ण पाठिंबा देईल, असे सांगून मागील वर्षी दिलेल्या वचनाची पूर्तता करून अभियंत्यांच्या वेतनश्रेणीचा प्रश्न सोडविण्यात आला असून त्यांना थकबाकी सुद्धा देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

    आपल्या अभियांत्रिकी क्षमतेच्या जोरावर भारताने चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केले आहे. तसेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रोत्साहनातून संपूर्ण भारतीय बनावटीची वंदे भारत एक्सप्रेस धावत आहे. याचा गौरवपूर्ण उल्लेख करून या घटना भारताच्या अभियांत्रिकी क्षमतेचे प्रतीक असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

    मुंबईला सुदृढ, स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त करायचे असल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्याची सूचना केली. मुंबईसह महाराष्ट्र ड्रग मुक्त करण्याचे शासनाचे धोरण असल्याचे सांगून त्याबाबत कार्यवाही सुरू केली असल्याचे त्यांनी सांगितले. दक्षिण मुंबईमध्ये आयकॉनिक अशा इमारती उभ्या कराव्यात, यासाठी विकासकांना प्रोत्साहन देण्याची सूचना त्यांनी केली. रहिवाशांना अपेक्षित असलेली मुंबई घडवण्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

    प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जी-20 परिषदेत जग जिंकले. महाराष्ट्रातील व्यवस्था सुद्धा उत्तम होती. याचे शेर्पा अमिताभ कांत यांनी ‘मुंबई आपने चमका दी’ या शब्दात कौतुक केले. तसेच जपानचे राजदूत सुझुकी हिरोशी यांनी यांनी समुद्री सेतू प्रकल्प पाहून ही एक यशकथा, अभियांत्रिकी आविष्कार असल्याचे म्हटले, ही आपल्या कामाला मिळालेली उत्स्फूर्त दाद आहे, याचा मुख्यमंत्र्यांनी यावेळी आवर्जून उल्लेख केला.

    खासदार राहुल शेवाळे म्हणाले, मागील वर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभियंत्यांच्या वेतनश्रेणीचा प्रश्न सोडविण्याचे वचन दिले होते, ते आज पूर्ण केले आहे.

    महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी नागरी सुविधा पुरविणारी महानगरपालिका आता पायाभूत सुविधा विकसित करणारी यंत्रणा झाली असल्याचे सांगितले. मागील वर्षभरात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या पाठिंब्यामुळे झपाट्याने विकासकामे होत असल्याचे सांगून सध्या मुंबईत एक लाख कोटींहून अधिकच्या सुरू असलेल्या कामांची माहिती त्यांनी दिली.

    यावेळी मान्यवरांच्या हस्ते ‘मी अभियंता’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed