• Fri. Nov 29th, 2024

    खुल्या भूखंडाच्या दत्तक धोरणाबाबत सद्य:स्थितीसह भविष्यातील नियोजनाबाबत पारदर्शकता राखावी – मंत्री मंगलप्रभात लोढा

    ByMH LIVE NEWS

    Sep 15, 2023
    खुल्या भूखंडाच्या दत्तक धोरणाबाबत सद्य:स्थितीसह भविष्यातील नियोजनाबाबत पारदर्शकता राखावी – मंत्री मंगलप्रभात लोढा

    मुंबई, दि. १५ : खुल्या भूखंडाच्या दत्तक धोरणाबाबत (ओपन स्पेस ॲडाप्शन पॉलिसी) मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिका प्रशासन आणि नागरिकांची संयुक्त बैठक मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात झाली.

    आपल्या प्रशासनात पारदर्शकता असावी यासाठी पालकमंत्री लोढा यांनी मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत किती मोकळे भूखंड आहेत, त्या पैकी किती भूखंडावर उद्याने आहेत, मैदाने किती आहेत, किती जागा दत्तक धोरणात येऊ शकतात या बद्दलची सर्व माहिती ३० दिवसांत महानगरपालिकेच्या संकेस्थळावर प्रकाशित करावी, असे सांगितले. भूखंडाची सद्य:स्थिती तसेच त्याबद्दलचे भविष्यातील नियोजन नागरिकांपर्यंत पोहोचावे जेणेकरून पारदर्शकता टिकवता येईल आणि नागरिकांचा विश्वास अधिक वृध्दिंगत होईल, असे त्यांनी सांगितले.

    या बैठकीसाठी महानगरपालिकेचे अधिकारी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, विविध सिटीझन फोरमचे प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.  या बैठकीमध्ये ओपन स्पेस ॲडाप्शन पॉलिसी म्हणजे नक्की काय, या मधील तरतुदी काय आहेत, यामध्ये काय बदल आवश्यक आहेत, तसेच ह्या धोरणात्मक निर्णयाची गरज आहे का यासारख्या विविध विषयांवर नागरिकांनी आपली मते मांडली. पालकमंत्री श्री. लोढा यांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना या सर्व सूचना लक्षात घेऊन त्या अनुषंगाने पाऊले उचलण्याचे सूचवले. त्याचप्रमाणे ओपन स्पेस पॉलिसीचा मसुदा संकेतस्थळावर उपलब्ध असून नागरिकांनी तो व्यवस्थित वाचून आपल्या सूचना द्याव्यात, असेही आवाहन पालकमंत्र्यांनी केले आहे.

    000

    संध्या गरवारे/विसंअ/

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed