• Fri. Nov 29th, 2024

    मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सव : विद्यार्थ्यांच्या प्रभातफेरीने शहरात उत्साहाचे वातावरण 

    ByMH LIVE NEWS

    Sep 15, 2023
    मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सव : विद्यार्थ्यांच्या प्रभातफेरीने शहरात उत्साहाचे वातावरण 

    औरंगाबाद, दि. 15 (विमाका) : ‘मराठवाडा मुक्तिदिनाचा विजय असो’…!  ‘मराठवाड्याचा जयजयकार’…! ‘मराठवाड्याचा विजय असो’…! ‘भारत माता की जय’…!  अशा विविध घोषणांनी आज सकाळी शहर दुमदुमले. निमित्त होते, मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शालेय विद्यार्थ्यांनी काढलेल्या प्रभात फेरीचे. क्रांती चौक येथून प्रारंभ झालेल्या या प्रभात फेरीत विद्यार्थ्यांचा उत्साह आनंददायी होता.

    आमदार संजय सिरसाट, विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड, महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत यांच्या हस्ते प्रभातफेरीला हिरवा झेंडा दाखविण्यात आला. सुमारे 40 शाळांचे 3 ते साडेतीन हजार विद्यार्थी प्रभात फेरीत सहभागी झाले होते. या फेरीदरम्यान विविध शाळेच्या विद्यार्थ्यांनी मल्लखांब, कुस्ती, योगासने, बॉक्सिंग, लेझीमची प्रात्यिक्षिके सादर केली.  शहराच्या विविध भागातून  फिरुन या प्रभात फेरीचा समारोप खडकेश्वर येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर झाला.

    विविध सांस्कृतिक कार्यक्रम व महिला बचत गटांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन

    मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर उभारण्यात आलेल्या भव्य मंडपात विद्यार्थी, शिक्षक, नागरिक यांच्या उपस्थितीत मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महानगरपालिकेच्यावतीने आयोजित तीन दिवसीय कार्यक्रम आणि महिला बचतगटांच्या प्रदर्शन व विक्रीचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन पार पडले.

    या कार्यक्रमास प्रमुख अतिथी व उद्घाटक म्हणून केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, मनपा आयुक्त जी. श्रीकांत, उपायुक्त रणजित पाटील, अपर्णा थेटे आदींसह क्रीडा व शिक्षण विभागाचे अधिकारी, प्रभात फेरीतील सर्व सहभागी विद्यार्थी, शिक्षक, खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.  या ठिकाणी देखील विद्यार्थ्यांनी मल्लखांब, कुस्ती, योगासने, बॉक्सिंग, लाठी प्रात्यक्षिके सादर केली.  यावेळी गायक अभिजित शिंदे व सरला शिंदे यांनी देशभक्तीपर गीते सादर करुन विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित केला.  उपस्थित सर्वच विद्यार्थ्यांनी त्यांच्या गाण्यांवर नृत्यही केले.

    केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. कराड यांनी उपस्थितांना मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवाच्या शुभेच्छा देताना मराठवाड्याला निजाम राजवटीपासून कशाप्रकारे स्वातंत्र्य मिळाले, अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या प्राणाची बाजी लावून हा स्वातंत्र्याचा लढा कसा लढला याची माहिती आपल्या मनोगतात दिली. भविष्यात आपल्या भारत देशाला महासत्ता बनविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

    प्रास्ताविकात जी. श्रीकांत यांनी मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवानिमित्त महानगरपालिकेच्यावतीने शहरात तीन दिवसांत आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. तसेच  मराठवाडा स्वातंत्र्यलढ्याबाबत माहिती देऊन विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यसैनिकांचा आदर्श अंगीकारण्यास सांगितले.

    तत्पूर्वी यश शिंपले, रवींद्र बोरा, सारा भावले,  वैष्णवी मस्के, आर्या नाईक या विद्यार्थ्यांनी  मराठवाड्याचा स्वातंत्र्यलढा या विषयावर मनोगत व्यक्त केले.

    यावेळी  माजी सैनिकांचा सहभाग असणाऱ्या नागरिक मित्र पथकातील सदस्यांचा आणि सफाई कर्मचाऱ्यांचा मान्यवर आणि विद्यार्थ्यांच्या हस्ते  सत्कार करण्यात आला.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed